रस्त्याच्या दुर्दशेने त्रस्त नागरिकांचा तीर्थपुरीत रस्तारोको; वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा
By दिपक ढोले | Published: April 10, 2023 05:47 PM2023-04-10T17:47:49+5:302023-04-10T17:49:03+5:30
घनसावंगी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे.
जालना : तीर्थपुरी येथील घनसावंगी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम त्वरित करावे, या मागणीसाठी तीर्थपुरी येथील सर्व पक्ष नागरिक व संभाजीनगरच्या नागरिकांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. सहा तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती. रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
घनसावंगी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. वाहने ये-जा करीत असल्याने धुळीचा मोठा त्रास संभाजीनगर (झोपडपट्टी) व व्यापाऱ्यांना होत होता. अनेकवेळा रस्ता सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सोमवारी सकाळी तीर्थपुरी ते अंबड रस्त्यावरील मुख्य डाव्या कालव्याच्या पुलावर सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सहा तास हे आंदोलन सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.
घनसावंगीच्या तहसीलदार कविता गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. जी. कांडलीकर, उपविभाग अभियंता बी. बी. खोसे यांनी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेंद्र पवार, भाजपचे अंकुश बोबडे, बळीराम लोहकरे, जयमंगल जाधव, श्रीकृष्ण बोबडे, घनश्याम चिमणे, मेहेरनाथ बोबडे, सचिन चिमणे, चंद्रकांत बोबडे, सतीश पवार, लक्ष्मण उढाण, तुळशीराम वानखेडे, रमेश बोबडे, रमेश कासार, अर्जुन भोसले, दत्ता टेकाळे, सुदाम मापारे, गजानन चव्हाण, रवींद्र बोबडे, सोमनाथ वरकड, सुभाष चिमणे, शेख जिलानी, संतोष बोबडे, अण्णा चिमणे, शिवाजी गवते, बबन शिंदे, दीपक चिमणे, भाऊसाहेब बोबडे, शरद वाजे, इसाक कुरेशी, लक्ष्मण नवले, किशोर मरकड, बालासाहेब तोष्णीवाल, राहुल पटेकर, लक्ष्मण कोरडे, आप्पा जंगले, साई करमाळे आदींची उपस्थिती होती.