जालना शहरातील रस्ते पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:13 AM2018-03-29T01:13:38+5:302018-03-29T01:13:38+5:30
जालना : महावितरणची पालिकेकडे
असलेली बारा कोटींची थकबाकी नगराध्यक्षांचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले असून, तांत्रिक बाबीत अडकलेल्या या मुद्द््यावर तोडगा काढत महावितरणने सहा कोटी माफ केले. तर पालिकेने तात्काळ उर्वरित थकबाकी ४ कोटी २५ लाख रुपये भरले. गत आठ ते दहा वर्षांपासून सुरु असलेल्या या लढ्याला अखेर यश आल्याने जालनेकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरात सुमारे ३० हजार विद्युत खांब आणि हायमास्ट शहरातील विविध भागांत बसविण्यात आले आहेत. याच्या वीजबिलापोटी महावितरणतर्फे पालिकेकडे अव्वाच्या सव्वा बिल आकारले गेले. कोणतेही मीटर रीडिंग नसताना अंदाजे बिल आकारले गेल्याचा मुद्दा नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हा प्रशासन आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिला. यानंतर पालिका प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी यांच्या बैठका होऊन अनेक चर्चेच्या फे-या झडल्या. यातून वीजबील आकारणी चुकीची असल्याचा निष्कर्ष काढत ११ कोटी २५ लाखांपैकी तब्बल सहा कोटी रुपये माफ करण्यात आले. पालिकेला चार कोटी २५ लाखांची रक्कम भरुन वीज पुरवठा पूर्ववत करता येऊ शकेल, असे महावितरणने कळविले. त्यानंतर नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी थकबाकीची रक्कम भरण्याचे निर्देश मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिले. थकबाकी मंगळवारी भरण्यात आली. शहरातील विविध भागांत असलेले पथदिवे टप्प्याटप्प्याने सुरु होणार आहेत.
सात ते आठ वर्षांपासून रखडलेला थकबाकीचा मुद्दा निकाली काढण्यात पालिका प्रशासनासह नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना यश आले.
यापुढे वीजबिला पोटी पालिकेला दरमहा तीन लाख रुपयांचे बिल येणार आहे. शहरातील विविध भागांतील अंधारात बुडालेले रस्ते दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघणार असल्याने जालनेकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.