शहागड, अंबडसह कुंभार पिंपळगाव परिसरातील रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:04 AM2021-09-02T05:04:28+5:302021-09-02T05:04:28+5:30
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीसह परिसरात मंगळवारी पहाटे दमदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने तीर्थपुरी ते ...
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीसह परिसरात मंगळवारी पहाटे दमदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने तीर्थपुरी ते अंबड- शहागड व कुंभार पिंपळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी दुपार पर्यंत ५० गावांचा संपर्क तुटला होता. तर गोदावरी नदीतील जोगलादेवी, मंगरूळ व राजाटाकळी बंधारे भरल्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दमदार पावसामुळे तीर्थपुरी ते कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील स्मशानभूमी जवळील नळकांडी पूल वाहून गेला. तसेच खालापुरी जवळील बहिरी नदीला पूर आल्याने संपूर्ण वाहतूक बंद होती. अंबड ते परभणी बस खालापुरी वरून परत आली व स्मशानभूमीजवळ येऊन थांबली. वाहतूक थांबल्याने आंतरवाली टेंभी, बानेगाव, मंगरूळ, भोगगाव, खडका, खालापुरी परिसरातील नागरिकांचा मंगळवारी दुपारपर्यंत संपर्क तुटला होता. तीर्थपुरी ते अंबड व शहागड रोड वरील खडकी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अंबड व शहागडचा संपर्क तुटला होता. शिवाय अनेकांच्या शेतातील उभ्या पिकात गुडघाभर पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले.
बंधाऱ्यांतून पाणी सोडले
तीर्थपुरीसह परिसरात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. गोदावरीच्या किनारपट्टीवरील भागात पाऊस झाल्याने गोदावरीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे जोगलादेवी बंधाऱ्यातून सकाळी सात वाजता २२ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी एक वाजता जोगलादेवी बंधाऱ्यातून पाच गेटमधून ३५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर मंगरूळ बंधाऱ्यातून दुपारी एक वाजता १० गेटमधून ९० हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. राजाटाकळी बंधाऱ्यातून सकाळी सात वाजता ७० हजार ६७९ क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी एक वाजता ५ गेटमधून विसर्ग कमी करून ६० हजार क्युसेक करण्यात आला होता.