दरोडेखोरांची किरायदार महिलेस मारहाण, धमकावून घरमालकिणीस आवाज देण्यास लावत लुटले
By दिपक ढोले | Published: June 16, 2023 07:47 PM2023-06-16T19:47:25+5:302023-06-16T19:54:46+5:30
शहरातील टीव्ही सेंटर भागातील म्हाडा कॉलनी भागातील घटना
जालना : किरायादार महिलेला घरमालकिणीला आवाज द्यायचे सांगून चोरट्यांनी घरमालकिणीला मारहाण करत घरातील रोख रक्कम व दागिने असा एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील टीव्ही सेंटर भागातील म्हाडा कॉलनी भागात शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील दूरदर्शन केंद्रासमोर म्हाडा कॉलनी आहे. या कॉलनीत प्रकाश सुपारकर यांचे घर आहे. प्रकाश सुपारकर यांची पत्नी सावित्री सुपारकर व त्यांची मुलगी रात्री नेहमीप्रमाणे घरामध्ये झोपलेले होते, तर उकाडा असल्याने त्यांचे किरायदार आणि इतर सदस्य घरांच्या गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी सुपाकर यांच्या किरायदाराच्या घराचा दरवाजा उघडला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. प्रकाश सुपाकर यांचे आईवडील राहत असलेली खोली उघडून त्यांनाही मारहाण केली. नंतर गच्चीवर झोपलेल्या किरायदार महिलेस धमकावून सुपारकर यांच्या पत्नी सावित्री सुपारकर यांना बाहेरून आवाज देण्यास सांगितले.
किरायादार महिलेने आवाज दिल्याने सावित्रीबाई सुपारकर यांनी दार उघडले. दार उघडताच सावित्रीबाई यांना समोर चार-पाच चोरटे दिसले. त्यामुळे सावित्रीबाई यांनी पुन्हा दार लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांना काठीने डोक्यात मारहाण करून जखमी केले. घरात प्रवेश करून घरातील साहित्य, लोखंडी कपाट, लोखंडी पेटी, महालक्ष्मीचे साहित्य अस्ताव्यस्त केले. हाती लागलेले ७३ हजार रुपये रोख व दागिने असा एकूण एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका ठाण्याचे सहायक निरीक्षक रवी अंभुरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली.
दरम्यान, या प्रकरणी सावित्रीबाई सुपारकर यांच्या फिर्यादीवरून चार संशयित दरोडेखोरांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अंभोरे करत आहेत.