दरोडा, अपघाताच्या तक्रारींमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:02 AM2020-03-01T00:02:12+5:302020-03-01T00:02:53+5:30
घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली.
विजय मुंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. माहिती मिळताच काही ठिकाणच्या अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच या तक्रारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार अधिकारी, कर्मचा-यांची तत्परता तपासण्यासाठी दिल्याचे समजताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.
पोलीस ठाण्यांमधील कामकाजात सुसूत्रता यावी, सर्व कामे वेळेत व्हावीत, तक्रारदारांच्या तक्रारी घेण्यासह त्यांना चांगली वागणूक मिळावी, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे वेळोवेळी अधिकारी, कर्मचा-यांना सूचना देत आहेत. शिवाय ठाणेस्तरावरील गुन्ह्यांचे प्रमाण, तपास यासह इतर बाबींवरही बैठकांमध्ये मार्गदर्शन केले जाते.
ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी सतर्क राहतात का? ठाण्यात येणाºया तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते का ? तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचारी तातडीने हालचाली करतात का ? यासह इतर बाबींची तपासणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी सायंकाळी तक्रारी घेऊन काही नागरिकांना पाठविले होते. हे तक्रारदार पाठविताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. अचानक दरोडा, लूटमार, अपघातासह इतर तक्रारी दाखल झाल्याने कर्मचा-यांसह अधिका-यांची धांदल उडाली. तक्रारदाराकडून माहिती घेऊन घटनास्थळी जाणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणे, पथकांना पाचरण करणे इ. प्रक्रिया काही ठाणेस्तरावरून राबविण्यात आली. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असताना या तक्रारी वरिष्ठांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचे समजताच अधिकारी, कर्मचा-यांना हायसे वाटले. या तक्रारीच्या परीक्षेत काही ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी पास झाले होते. तर इतर काही ठिकाणावरील अहवाल रात्री उशिरापर्यंत वरिष्ठांकडे आला नव्हता.
तत्परता पाहण्यासाठी राबविला उपक्रम
पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी सतर्क राहावे, ठाण्यात येणारी प्रत्येक तक्रार नोंदवून घ्यावी, तक्रारीनुसार तातडीने कार्यवाही करावी, याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठाणेस्तरावरील अधिकारी, कर्मचारी किती सतर्क आहेत? तक्रारदाराला वागणूक कशी मिळते? तक्रारीनुसार कार्यवाही होते का याची पाहणी करण्यासाठी शनिवारी हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व ठाणेस्तरावरील उपक्रमांचा अहवाल मागिवला असून, तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºयांवर कारवाई होईल. -समाधान पवार, अपर पोलीस अधीक्षक