जालन्यात डॉक्टरचे घर फोडले; सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल लंपास
By दिपक ढोले | Published: September 23, 2022 05:34 PM2022-09-23T17:34:27+5:302022-09-23T17:36:42+5:30
तोंडाला रुमाल बांधलेल्या चार चोरट्यांनी घराच्या पाठीमागील एका खोलीची कुलूप तोडून आत प्रवेश केला.
जालना : घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आता प्रवेश केला. कोयता, टाबीचा धाक दाखवून सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा चार लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना जालना शहरातील माऊलीनगर भागात शुक्रवारी पहाटे चार वाजल्याच्या सुमारास घडली.
शहरातील माऊलीनगर येथे डॉ. अनिल पोकळे यांचे घर आहेत. गुरुवारी रात्री अनिल पोकळे व त्यांची पत्नी बेडरूममध्ये झोपली होती, तर दहावीत शिकणारी मुलगी बाजूच्या रूममध्ये झोपली होती. शुक्रवारी पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या चार चोरट्यांनी घराच्या पाठीमागील एका खोलीची कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्यांनी सुरुवातीला टाबीने मुलीच्या दरवाज्याचा आतील कडीकोयंडा तोडला. मुलीच्या रूममधील सोन्या- चांदीचे दागिने काढून घेतले.
नंतर चोरट्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला. कोयता व टाबीचा धाक दाखवून सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम ८० हजार रुपये असा चार लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला, अशी माहिती अनिल पोकळे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी ठसे पथकाला पाचारण करण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट दिली.