स्टील कंपनीच्या लेखापालास एमआयडीसीत भर दिवसा लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:14 AM2018-05-25T01:14:05+5:302018-05-25T01:14:05+5:30
एका स्टील कंपनीच्या लेखापालाकडील दीड लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून हिसकावून घेत पोबारा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील एका स्टील कंपनीच्या लेखापालाकडील दीड लाख रुपये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून हिसकावून घेत पोबारा केला. जालना औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
औद्योगिक वसाहतीमधील भाग्यलक्ष्मी स्टील कारखान्यात सनी गणेश चिलखा (३२, रा. संभाजीनगर) हे लेखापाल म्हूणन काम करतात. दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास चिलखा हे अन्य एका साथीदारासोबत दुचाकीने औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी कंपनीतून दीड लाख रुपये घेऊन भाग्यलक्ष्मी कंपनीकडे जात होते. गजकेसरी कंपनीपासून काही अंतरावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे चिलखा यांच्या साथीदाराने दुचाकीचा वेग कमी केला. त्याच वेळी दोघेजण विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव आले. त्यांनी सनी चिलखा यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावली. चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत पळून गेले. या प्रकारानंतर चिलखा यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात येऊन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे ठाणे अमलदार उद्धव साळवे यांनी सांगितले. फौजदार एस. एन. शेख तपास करत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये या पूर्वीही असे प्रकार घडले आहेत. व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.