करमणूक केंद्र नावाखाली ‘लुटारू’ लॉटरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:49 AM2018-02-28T00:49:52+5:302018-02-28T00:50:00+5:30
शहरातील विविध भागांत करमणूक केंद्राच्या नावाखाली अवैध आॅनलाईनचा लॉटरी व्यवसाय सर्रास सुरु असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जात असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील विविध भागांत करमणूक केंद्राच्या नावाखाली अवैध आॅनलाईनचा लॉटरी व्यवसाय सर्रास सुरु असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जात असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले. विशेष म्हणजे या लॉटरी चालविणा-यांकडे कुठलाही शासन परवाना नसतानाही हा व्यवसाय फोफावला आहे. याकडे जिल्हा प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
दर एका मिनिटाला आॅनलाईन पद्धतीने सोडत काढून १ रुपयास तब्बल ९० रुपये दिले जात असल्याने पैशांच्या आमिषाने तरुणाई याच्या आहारी जात आहे. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या आॅनलाईन लॉटरी व्यवसायात रॅकेट सक्रिय असून, साखळी पद्धतीने खुलेआम शहरात करमणूक केंद्राच्या नावाखाली आॅनलाईन लॉअरीचे दुकान मांडल्याचे आढळून आले. नवीन आणि जुना जालना अशा शहरातील विविध भागांत जवळपास ५० लॉटरी सेंटर्स आढळून आली. आॅनलाईन लॉटरी सेंटर्सधारकांकडून ग्राहकास दिल्या जाणा-या पावतीवर शासन परवाना वा मान्यतेचा उल्लेख नसल्याचे उघडकीस आले. याद्वारे एकप्रकारे शासनाचा कर चुकविला जात आहे. तर दुसरीकडे गोरगरीब जनतेना लुटण्याचा धंदाच खुलेआमपणे शहरात सुरु आहे. इयत्ता दहावी आणि बारावीत शिक्षण घेणारी मुलेही या लॉटरीच्या आहारी गेली आहेत.
या लॉटरी सोडतीतून नव्वद पटीने पैशांचे आमिष दाखविले जात असल्याने गरीब जनता यात लुबाडली जात आहे. शहरात या व्यवसायाची जवळपास दीड ते दोन कोटींची उलाढाल असल्याचे एका लॉटरी व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना सांगितले.
या रॅकेटमध्ये शहरातील अनेक व्हाईट कॉलर असलेल्या व्यक्तींचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. आॅनलाइन आकड्यांच्या या खेळात अनेकांचे संसार बरबाद होत आहेत.
या संदर्भात जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
सॉफ्टवेअर मुंबईतून जालन्यात
मुंबईत आॅनलाईन लॉटरी सोडतीचे सॉफ्टवेअर बनविणारी टोळी सक्रिय आहे. येथूनच जालना वा इतर शहरांत ते टक्केवारीवर दिले जात आहे. ६० व ४० असे उत्पन्नाचे प्रमाण ठेवून या सॉफ्टवेअरद्वारे आॅनलाईन लॉटरीचा व्यवसाय खुलेआम केला जात आहे.
४काही महिन्यांपूर्वीच गुन्हे शाखेच्या अहवालानंतर जालना शहरातील बहुतांश मटका बुकींना शहरातून हद्दपार करण्यात आले होते. यात मुख्य मटका बुकी कमलकिशोर बंगचाही समावेश आहे. अशीच कारवाई आॅनलान लॉटरी चालकावंर होणार का, हा प्रश्न आहे.