हायड्रोलिक पंपचा वापर करून टेंभुर्णीत पेट्रोल पंपावर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:26 PM2019-07-17T12:26:55+5:302019-07-17T12:30:27+5:30
कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेनंतर पोलीस, ग्रामस्थांनी दोघांना पकडले.
टेंभुर्णी (जि. जालना) : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे सोमवारी रात्री एका टोळीने डिझेल चोरीच्या उद्देशाने पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा टाकला. पंपावरील कर्मचाऱ्यांना वेळीच जाग आल्याने दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाठलाग करून उद्धव बापुराव शिंदे (रा. बावी ता. वाशी, जि. उस्मानाबाद) आणि नितीन बापुराव पवार ( रा. तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद) या दोघांना पकडले, तर रामा पांड्या पवार, अनिल विश्राम काळे, चंदन भास्कर काळे, रामा सुबराव काळे ( सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी पोलिसांनी चार ट्रक तसेच अन्य साहित्य मिळून जवळपास एक कोटी २५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
येथील जाफराबाद- देऊळगावराजा रस्त्यावर टेंभुर्णी येथील सरस्वती विठोबा शिंदे यांच्या मालकीचा हा पेट्रोलपंप आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान पेट्रोलपंप बंद करून पंपावरील दोघे कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या रूममध्ये झोपले होते. रात्री साडेबारानंतर एका कर्मचाऱ्याला जाग आली असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात डिझेल टँकजवळ कोणीतरी संशयित दिसले. त्याने सहकाऱ्याला उठवून लगेच गावात मालक व त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. माहिती मिळताच पेट्रोल पंप मालकाचा भाचा संजय सावंत घटनास्थळी हजर झाला. दरोडेखोरांनी मारहाण करून त्याला जखमी केले. पाठोपाठ पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले.
दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीस व ग्रामस्थ रस्त्यावर ट्रकला आडवे झाले असता, ट्रक त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस त्र्यंबक सातपुते, पेट्रोलपंप व्यवस्थापक सुनील जगधणे व संतोष शिंदे हे तिघे त्वरीत बाजूला झाल्याने बालंबाल बचावले. पोलीस व ग्रामस्थांनी पाठलाग करून दोघांना पकडले, तर सात ते आठ जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. या दरोडेखोरांनी १३० लिटर डिझेल टँकमधून बाहेर काढले होते.
हायड्रोलिक पंपचा वापर
दरोडेखोरांनी डिझेल चोरण्यासाठी ‘हायड्रोलिक पंप’चा वापर केला. पंपापासून दूर अंतरावर डिझेल भरण्यासाठी कॅन ठेवून जवळपास पाच पाईप डिझेल टाकीत टाकले. नंतर प्रत्येक नळीला लावलेल्या पंपाने डिझेल बाहेर ओढणे सुरू केले. कॅनमध्ये डिझेल भरून ट्रकच्या डिझेल टाकीत टाकण्याचा त्यांचा डाव होता. यासाठीच चार ट्रक त्यांनी सोबत आणले असावे असा अंदाज आहे.
कारवाई कोणी केली?
ही कारवाई टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सपोनि. सुदाम भागवत यांच्यासह पोलीस कर्मचारी त्र्यंबक सातपुते, गजेंद्र भुतेकर, प्रदीप धोंडगे, दिनकर चंदनशिवे, क्षीरसागर आदिंनी प्रयत्न केले. यावेळी माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, संजय सावंत, पेट्रोल पंपवरील कर्मचारी निलेश मोरे, शेख अल्ताफ, सुनील जगधणे, गणेश जाधव, विशाल शिंदे, संतोष शिंदे, नितीन शिंदे, रामू पन्हाळकर, एकनाथ अनपट, कृष्णा भोरे, सूर्यप्रकाश मघाडे, स्वप्नील जाधव आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले.
२५ दिवसांपूर्वी अडीच हजार लिटर डिझेलची झाली होती चोरी
याच पेट्रोलपंपवर २३ जून रोजी डिझेलची धाडसी चोरी झाली होती. त्यात चोरट्यांनी अडीच हजार लिटर डिझेल चोरून नेले होते. त्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्या चोरीतही याच चोरट्यांचा हात असल्याचा संशय आहे.