पिंपळखुटा वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत दोन महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 09:40 AM2021-12-25T09:40:45+5:302021-12-25T09:42:46+5:30
पाच महिलांना मारहाण : दोघी गंभीर जखमी, दागिन्यांची लूट
जाफराबाद (जि.जालना) : चार ते पाच दरोडेखोरांनी पाच महिलांना काठीने जबर मारहाण करीत त्यांच्या अंगावरील लाखो रूपयांचे दागिने लंपास केले. ही खळबळजनक घटना जाफराबाद- निमखेडा मार्गावरील पिंपळखुटा (ता.जाफराबाद) शिवारात शुक्रवारी मध्यरात्री घडली.
सखुबाई रामदास खोसरे, रंजनाबाई संजय गाडेकर अशी जखमी महिलांची नावे आहेत. पिंपळखुटा शिवारातील शेतवस्तीवर राजू रामदास खासेरे हे कुटुंबासह राहतात. त्यांची आई सखुबाई खोसरे या आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या चार मुली शुक्रवारी आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास राजू खोसरे हे पत्नी, मुलासह एका खोलीत झोपले होते. तर त्यांची आई व चार बहिणी या एका खोलीत झोपल्या होत्या. दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी खासेरे यांच्या घरात प्रवेश केला. राजू खासेरे झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावली आणि त्यांची आई झोपलेल्या खोलीत प्रवेश केला. त्यावेळी सखुबाई खोसरे, रंजनाबाई गाडेकर व इतर महिलांच्या अंगावरील लाखो रूपयांचे दागिने काढून घेतले.
महिलांनी आरडाओरड करताच दरोडेखोरांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत सखुबाई खोसरे व त्यांची मुलगी रंजनाबाई गाडेकर या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जाफराबादेत प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथील रूग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोनि. रमेश जायभाये, पोउपनि प्रल्हाद मदन, तडवी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. तसेच ठाणे हद्दीतील पोलिसांना माहिती देत दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.