हजारो वर्र्षांपूर्वीचे दक्षिणमुखी रोकडोबा मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:58 PM2019-10-12T23:58:59+5:302019-10-12T23:59:31+5:30
भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथे जागृत दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे.
- गोकुळ सपकाळ, जळगाव स.
भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथे जागृत दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे. भक्तांच्या मनोकामना व नवसाला पावणारा हनुमान म्हणून हे मंदिर प्रसिध्द आहे. हे मंदिर दक्षिणमुखी रोकडोबा महाराज मंदिर म्हणून देखील ओळखले जात आहे. हजारो वर्षांपूर्वी ग्रामस्थांतर्फे या हनुमान मंदिराची स्थापना केलेली आहे. येथे जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. दर अमावास्येला येथे भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळते.
हजारो वर्षांपूर्वी पाण्याच्या प्रवाहासोबत एक दगडाची शिळा वाहत आली आणि गावातील एका जागी थांबली. यानंतर ग्रामस्थांकडून त्याच जागेवर मूर्तीची पूजा- आरती करण्यात आली. कालांतराने मंदिर बांधकामाच्या वेळी मूर्तीला हलविण्याचे नागरिकांनी ठरविले. याचवेळी गावातील वानरांनी संपूर्ण गावामध्ये ओरडून आक्रोश सुरू केला. हा प्रकार दोन दिवस सुरू होता. यानंतर हनुमंतांची मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. यासह अनेक आख्यायिका या हनुमंताच्या मूर्तीच्या आहेत. विशेष म्हणजे येथील हनुमान मूर्तीला शेंदूर लावला जात नसून, तेलाने अभिषेक केला जातो. तसेच तेलानेच स्नान घातले जाते. यामुळे या हनुमंताच्या मूर्तीचा शनीशी संबंध असल्याचे भक्तगण सांगतात. जो कोणी व्यक्त मनोभावे या मूर्तीपुढे नतमस्तक होईल, त्यावरील संकटे दूर होतात, अशी भक्तांची धारणा आहे. दक्षिणमुखी हनुमान मूर्तीच्या दर्शनासाठी दर अमावास्येला भाविक येतात. मूर्तीला अभिषेक करतात.