नळणीच्या तरुणाने केली ‘भोंगा’ मध्ये भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:45 AM2019-08-11T00:45:20+5:302019-08-11T00:45:58+5:30

कोणाचे नशीब केव्हा बदलेल, हे सांगता येत नाही. असाच प्रसंग भोकरदन तालुक्यातील नळणी येथील अविनाश संपत कोलते या तरुणाच्या बाबतीत घडला तो दिग्दर्शकाच्या एका फोनमुळे ! त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘भोंगा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती़

Role in 'Bhanga' by the young man of the pipe | नळणीच्या तरुणाने केली ‘भोंगा’ मध्ये भूमिका

नळणीच्या तरुणाने केली ‘भोंगा’ मध्ये भूमिका

Next

फकिरा देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : कोणाचे नशीब केव्हा बदलेल, हे सांगता येत नाही. असाच प्रसंग भोकरदन तालुक्यातील नळणी येथील अविनाश संपत कोलते या तरुणाच्या बाबतीत घडला तो दिग्दर्शकाच्या एका फोनमुळे ! त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या ‘भोंगा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती़
नळणी येथील अविनाश संपत कोलते या तरूणाचे शिक्षण सिल्लोड येथे झाले. बीएससी झाल्यानंतर पुढे काय करावे, असा प्रश्न त्याच्या समोर होता. मात्र, सुरुवातीपासून काही तरी करण्याची त्याची धडपड होती. त्यामुळे त्याने फोटोग्राफी सुरू केली. यातून एका चॅनलमध्ये त्याला नोकरी मिळविली. मात्र, त्या ठिकाणी त्याचे मन रमत नव्हते, दरम्यान त्याची काही सिनेअभिनेत्यांशी ओळख झाली. सिनेसृष्टीचा लळा लागला असला तरी ग्रामीण भागातून आलेल्या तरूणाला संधी कशी मिळणार, हा प्रश्न होता. अविनाशने खचून न जाता मेहनतीने तयारी केली. सुरूवातीला चित्रपटामध्ये केवळ फोटोग्राफी करण्याचे काम मिळाले, पुढे त्याला ‘ड्रामा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, शिवाय त्याने ‘समर्थ’ हा चित्रपट प्रदर्शित केला. त्यानंतर ‘संघर्ष’ नाटकात काम मिळाले. या नाटकाला २००७ मध्ये राज्य नाट्यस्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळाला. मात्र, पुन्हा कामाची संधी मिळेल की नाही, या चिंतेने कोलते गावाकडे आला होता.
अविनाश, तू आहे त्याच परिस्थितीत मालेगावला ये
मार्च २०१८ मध्ये तो भोकरदन येथे आलेला असताना ‘भोंगा’ चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटम पाटील यांचा अविनाशला फोन आला. अविनाश, तू आहे त्याच परिस्थितीत (मालेगाव, जि. नाशिक) येथे ये. कोलते तेथे जाण्यापूर्वी सिनेमात काम करणारी टीम तेथे हजर होती. यानंतर सर्व जण (मांढुरणी, ता. मालेगाव) येथे गेले आणि ‘भोंगा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली. यात अविनाशने नाम्याची भूमिका चांगल्या प्रकारे केली. यामुळे दिग्दर्शकाने त्याच्या पाठीवर थाप मारली. यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुढे हा सिनेमा चांगला चालला होता आणि नुकताच या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे.
फोनमुळे संधी मिळाली
अत्यंत खडतर प्रवास करून मला सिनेमात केवळ फोटो काढण्याच्या कामाची संधी मिळाली होती. दरम्यान ‘भोंगा’ चे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केलेल्या एका फोनमुळे मला ’भोंगा’ चित्रपटात ‘नाम्या’ ची भूमिका करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याचा खूप आनंद झाला असल्याचे अविनाश कोलते याने सांगितले.

Web Title: Role in 'Bhanga' by the young man of the pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.