रुफ टॉप बसवा; वीज वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:03 AM2018-05-27T01:03:04+5:302018-05-27T01:03:04+5:30
वीजेचे वाढणारे दर, पुरेशी उपलब्धता नसणे या पार्श्वभूमीवर आता शहरात सौर ऊजेर्चा वापर करून घराच्या छतांवर वीजनिर्मिती केली जात आहे.
बाबासाहेब म्हस्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वीजेचे वाढणारे दर, पुरेशी उपलब्धता नसणे या पार्श्वभूमीवर आता शहरात सौर ऊजेर्चा वापर करून घराच्या छतांवर वीजनिर्मिती केली जात आहे. शहरातील मोठी रुग्णालये, वित्तीय संस्था, कार्यालयांच्या छतावर रुफ टॉप बसवून विजेची गरज भागविण्याला प्राधान्य दिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही सौरउर्जेपासून तयार वीज वापरली जात आहे. सौर उर्जेच्या वापरातून वीजबिलात लाखो रुपयांची बचत होत आहे.
विजेचा वाढता खर्च कमी करण्यासाठी नागरिक घरी सौर ऊर्जेवर पाणी तापवण्यासाठी सोलर वॉटर हिटरचा वापर करतात. त्यातून घरगुती गॅसची बचत होते. मात्र, प्रत्येकाने संपूर्ण घरासाठी सौर उर्जेपासून वीज निर्मितीकरून स्वयंपूर्ण व्हावे याबाबत शासनाकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. घराच्या छतावर घरगुती वापरासाठी सौलर पॅनलचा वापर वाढावा यासाठी राज्यशासनाने रूफ टॉप पॉलिसी सुरू केली आहे. यात सौर पॅनलचे दर कमी करण्यात आल्यामुळे ही योजना आता सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे. याचा परिणाम म्हणजे शहरातील अनेक इमारतींवर रुफ टॉप बसविल्याचे दिसत आहे. विशेषत: मोठ्या रुग्णालये यास रुफ टॉप बसविण्यास प्राधान्य देत आहेत.
जालना शहरात एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून रुफ टॉप सौलर पॅनल बसविण्याचे काम पाहणारे इलेक्ट्रिक इंजिनिअर सांप्रत चिपलकट्टी यांनी सांगितले, की रुफ टॉप पद्धतीमध्ये घरांवर सोलर पॅनल बसवले जातात. सूर्यप्रकाशापासून निर्माण होणारी वीज इर्न्व्हटरमध्ये साठवली जाते. त्याला नेट मीटर जोडले जाते. नेट मीटरमध्ये निर्माण होणारी वीज ग्राहकाने किती वापरली, तसेच अतिरिक्त ठरणारी वीज महावितरणाच्या ग्रीडला किती जोडली अशी नोंद घेण्याची सुविधा आहे. सूर्यकिरणे प्रखर असल्यास अधिक वीजनिर्मिती होते. गरजपेक्षा अधिक तयार झालेली वीज थेट महावितरणाच्या रोहित्राला अॅटो पद्धतीने पाठविण्याची सुविधा आहे.
ग्राहक त्याला आवश्यक असलेली वीज वापरू शकतो. सकाळी अतिरिक्त निर्माण झालेली वीज साठवून ठेवण्यापेक्षा थेट महावितरणला विकता येते. ग्राहक स्वत: निर्मिती केलेली वीज जितकी वापरेल, तितका महावितरणचा भार कमी होतो. अतिरिक्त युनिट महावितरणला विकले तर ग्राहकाची रक्कम समायोजित केली जाते. खूपच अतिरिक्त वीज महावितरणला दिल्यास वर्षभराचा हिशेब करून ग्राहकाला त्या विजेचा मोबदलाही दिला जातो.
सोलार : वाढत्या स्पर्धेमुळे किमतीत घट
काही वर्षांपर्यंत सौर ऊजेर्साठी लागणारे सोलर पॅनल खरेदी करणे खूप खर्चिक होते. आता त्यातील दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. एकदा पॅनल बसवल्यानंतर निर्माण होणारी वीज आणि सोलर पॅनलचे आयुष्य बघितले तर शून्य देखभाल खचार्मुळे ग्राहकांना ते परवडते. सौलररुफ टॉप बसविण्याचा खर्च तीन ते चार वर्षांत सहज निघू शकतो. सध्या सोलर पॅनलच्या वितरणात देश-विदेशातील कंपन्यांमुळे पॅनलचे दर स्पर्धात्मक झाले आहेत. साधारणत: एक किलो वॅट वीज निर्मितीच्या दृष्टीने विचार केला तर किमान ८५ हजार रुपये इतका खर्च येतो. सकाळी साडेदहा वाजेनंतर वीज निर्मितीला वेग येतो तोपर्यंत आठ ते नऊ टक्के वीजनिर्मिती होते. इन्व्हर्टरच्या माध्यमातून तयार वीज साठवून हवी तेंव्हा वापरता येवू शकते.