कोठा कोळी जवळील तलावाचा सांडवा फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 12:26 AM2019-11-05T00:26:05+5:302019-11-05T00:26:25+5:30
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून जवळच असलेल्या कोठा कोळी शिवारातील पाझर तलावाचा सांडवा अज्ञात लोकांनी फोडला
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथून जवळच असलेल्या कोठा कोळी शिवारातील पाझर तलावाचा सांडवा अज्ञात लोकांनी फोडला आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. अनेक वर्षानंतर तलाव भरला असला तरी वाहून जाणारे पाणी पाहता पुन्हा या भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
कोठा कोळी शिवारात १९७२ च्या दुष्काळात पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून पाझर तलाव बांधण्यात आला. या तलावामुळे परिसरातील शंभर ते दोनशे हेक्टर शेती सिंचनाखाली आली. तर कोठा कोळी गावाचा कायमस्वरुपी पाणी प्रश्न मार्गी लागावा यासाठी तलाव उभारला. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पाझर तलाव तुडूंब भरला होता. तर बऱ्याच वर्षाने तलावात मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतीला फायदा होणार होता. मात्र, येथील पाझर तलावाचा सांडवा शिवारातीलच अज्ञातांनी फोडला आहे. त्यामुळे या तलावातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सांडवा मातीच्या भिंती शेजारुनच फोडल्याने तलाव फुटतो की काय ? अशी भीती तलावाखालील कोठा कोळी ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. लाखो लिटर पाणी वाया जात असून, पुन्हा पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या सांडव्याची दुरूस्ती करावी, सांडवा फोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
प्रथमच तलाव भरला
१९७२ नंतर प्रथमच हा पाझर तलाव भरला होता. त्यामुळे गावाचा पाणीप्रश्न मिटणार होता. मात्र, अज्ञात लोकांनी या तलावाचा सांडवा फोडल्याने कोठा कोळी गावाला पुन्हा पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.
- अंबादास बावस्कर, सरपंच,कोठा कोळी