चादरीची केली दोरी, जेलची २२ फुटांची भिंत ओलांडली; बलात्काराच्या गुन्ह्यातील कैदी फरार
By दिपक ढोले | Published: September 18, 2023 05:03 PM2023-09-18T17:03:51+5:302023-09-18T17:05:11+5:30
जालन्यातील कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
जालना : चादर, दोरीच्या साह्याने २२ फुटांची संरक्षण भिंत ओलांडून कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना जालना शहरातील इंदेवाडी शिवारातील जिल्हा कारागृहात रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. तुळशीराम मुरलीधर काळे (रा. बाजार गल्ली, आष्टी) असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
तुळशीराम काळे याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो शिक्षा भोगत होता. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या कारखाना विभागातील १८ कैद्यांना नेहमीप्रमाणे स्वयंपाकगृहाच्या विभागात कारागृह शिपाई पो.काॅ. रामआप्पा परळकर हे घेऊन गेले होते. स्वयंपाकगृहात गेल्यानंतर कैद्यांची मोजणी केली असता, त्यात एक कैदी दिसून आला नाही. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली व त्यांनी शोधाशोध सुरू केली.
कैदी तुळशीराम काळे हा असल्याची खात्री पटल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आधी कारागृहात सर्वत्र त्याला शोधले. तुळशीराम यास अंगावर घेण्यासाठी देण्यात आलेली एक चादर व दोरी एकमेकांना बांधून ती कारागृहाच्या भिंतीच्या तटाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. चादर व दोरीच्या साह्यानेच भिंतीवर चढून तो पळून गेल्याची खात्री कारागृह प्रशासनास झाली. त्यानंतर पो.काॅ. रामअप्पा परळकर यांच्या फिर्यादीवरून संशयित कैदी तुळशीराम काळे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या २२४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच कारागृह प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणलेला कैदीही पळून गेल्याची घटना घडली होती.
डीवायएसपींची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सपोनि अंभोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्ही असतांना कैदी कसा पळाला ?
जिल्हा कारागृहात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. असे असतांनाही कैदी चादर व दोरी बांधून पळाला आहे. याकडे कारागृह प्रशासनाचे लक्ष कसे केले नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, तुळशीराम काळे याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो शिक्षा भोगत होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली.