रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रलचा ‘मदतीचा हात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:26 AM2019-03-30T00:26:06+5:302019-03-30T00:27:04+5:30
हात गमवून अपंगत्व आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रलने ‘मदतीचा हात’ पुढे करीत मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन केले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अपघात किंवा अन्य कारणाने हात गमवून अपंगत्व आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रलने ‘मदतीचा हात’ पुढे करीत मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन केले आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सी.टी.एम.के. शाळेत हे शिबीर घेण्यात येणार आहे.
एखाद्यावर ओढवलेले अपंगत्व म्हणजे त्याचा केवळ एक अवयव निकामी होत नाही तर अपंगत्व म्हणजे त्या व्यक्तीची जगण्याची उमेद आणि जीवनातील उत्साहच हरविण्याचा क्षण ठरतो. अशा मनातून खचलेल्या दिव्यांगांना आधार देण्याचा वसा जालना येथील रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रल या सेवाभावी संस्थेने उचलला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रल ही सेवाभावी संस्था सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यात हृदयविकार शस्त्रक्रिया, मोफत नेत्ररोग तपासणी तसेच शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जॉगिंग ट्रॅक, आरोग्य तपासणी शिबीर, स्वर्गरथ सुविधा, पाणी वाचवा झाडे लावा-जगवा उपक्रम, लहान मुलांसाठी संगोपन कार्यशाळा, असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम रोटरी क्लबने आजपर्यंत राबविले आहेत. हीच सामाजिक बांधिलकी कायम जपत रोटरीने कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराच्या आयोजनासाठी रोटरी क्लब आॅफ पुना डाउनटाऊन तसेच रोटरी क्लब आॅफ निजामाबाद यांचे सहकार्य मिळणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख डॉ. नीलेश सोनी, डॉ. श्रेयांस गादिया, सचिव सागर कावना यांनी केले आहे.
कृत्रिम हात प्रत्यारोपणामुळे दिव्यांगांच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडणार असून त्यांना दैनंदिन काम करणे सहज शक्य आणि सोपे होणार आहे. फक्त दिखाऊ नाही तर या हाताचा प्रत्यक्ष वापर करून कुठलेही काम सहजपणे करता येणार आहे. अत्याधुनिक एल-एन-४ असा कृत्रिम हात प्रौढ दिव्यांग तसेच लहान मुलांना बसविला जाणार आहे.
आतापर्यंत या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी २०० रुग्णांनी नोंदणी केली असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून याठिकाणी रुग्ण येणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष डॉ. स्वप्नील बडजाते यांनी दिली आहे.