देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटविणार रोटरीचा ‘सरजमीन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:29 AM2018-01-17T00:29:20+5:302018-01-17T00:31:01+5:30
रोटरी क्लब परिवारातर्फे जालन्यात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याच्या उद्देशाने ‘सरजमीन’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरीचे दिनेश राठी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रोटरी क्लब परिवारातर्फे जालन्यात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याच्या उद्देशाने ‘सरजमीन’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरीचे दिनेश राठी यांनी दिली.
रोटरी परिवाराचे आदेश मंत्री, दिनेश राठी, धीरेंद्र मेहरा, सुरेश मगरे यांनी मंगळवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी रोटरी क्लब आॅफ जालना, रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रल, रोटरी क्लब आॅफ रेनबो, रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनतर्फे जिल्ह्यात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
जालन्यातील दानकँुवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर प्रजासत्ताक दिनी सायंकाळी ५ वाजता ‘सरजमीन’ हा देशभक्तीपर कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात दहा हजार लोकांचा सहभाग राहणार असल्याचे दिनेश राठी म्हणाले. ज्यात जिल्हा परिषद व खाजगी अशा विविध शाळांतील मुले, शिक्षक, वकील, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, प्राध्यापक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, बँकिंग इ. क्षेत्रांतील लोकांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात ५ शहिदांच्या कुटुंबियांना गौरविले जाणार आहे.
कोलकाताचा ‘समन्वय समवेत’ समूह
जालन्यात होणाºया ‘सरजमीन’ या कार्यक्रमात कोलकाता येथील ‘समन्वय समवेत’ हा चमू देशभक्तीपर गीतांसह इतर प्रात्यक्षिके सादर करणार आहे.
१ तास ४० मिनिटे हा कार्यक्रम ८० पेक्षा अधिक सदस्य दृक-श्राव्य माध्यम, नृत्य आणि नाटिकेद्वारे सादर करतील.
या समूहाने आतापर्यंत देशभरातील जयपूर, कोलकाता, चेन्नई, दिल्ली, अमरावती इ. ठिकाणी कार्यक्रम केल्याचे धीरेन मेहरा यांनी सांगितले.
अत्याधुनिक तंत्राद्वारे सादरीकरण
दानकँुवर महाविद्यालयाच्या मैदानावर अत्याधुनिक तंत्राद्वारे रंगमंच उभारला जाणार आहे. यामध्ये ध्वनी यंत्रणेसह विद्युत रोषणाई व इतर विविध साहित्य वापरले जाईल. असा कार्यक्रम ‘न भूतो न भविष्यती’ होणार असल्याचा दावा आदेश मंत्री यांनी केला.
दहशतवादाविरुद्ध ‘सरजमीन’
सध्या दहशतवादी कारवायांमुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. दहशतवादाला शह देण्यासाठी ‘सरजमीन’ हाच पर्याय ठरु शकतो. याद्वारे युवक, तरुण आणि प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.