जरांगे यांना पोलीस उचलणार, अफवा पसरल्याने काही तासातच युवकांची फौज अंतरवालीत
By विजय मुंडे | Published: November 1, 2023 01:01 AM2023-11-01T01:01:48+5:302023-11-01T01:06:40+5:30
इंटरनेट बंदचा परिणाम : ठिकठिकाणी युवकांचा पहारा
अंतरवाली सराटी (जि.जालना) : जालना जिल्ह्यात काही अपवादात्मक घटना वगळता मंगळवारी रात्रीपर्यंत शांततेत आंदोलन सुरू होते. परंतु, अचानक सायंकाळी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पोलिस उचलणार अशी अफवा पसरली. त्यामुळे मिळेल त्या वाहनातून हजारो युवकांनी मंगळवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी गाव गाठले होते.
महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्णत्वास येत नसल्याने राज्याच्य विविध भागात विशेषत: बीड जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. असे असले तरी मनोज जरांगे पाटील हे शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन समाजाला करीत आहेत. परंतु, आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मोबाईल इंटरनेट सेवा ठप्प झाली. त्यामुळे अनेकांच्या मनात मनोज जरांगे पाटील यांना पोलिस उचलणार, अशी संशयाची सुई फिरली आणि पाहता पाहता मिळेल त्या वाहनाने हजारो युवक अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास अंतरवाली सराटी गावात ठिकठिकाणी युवकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसून येत होते. परंतु, गावात शांतता होती.