ढवळेंची सेवाग्रामपर्यंत गांधी विचारांसाठी दौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:02 AM2019-09-10T01:02:50+5:302019-09-10T01:04:01+5:30
महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने जालन्यातील वकील राजेभाऊ ढवळे जालना ते सेवाग्राम दौडणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने जालन्यातील वकील राजेभाऊ ढवळे जालना ते सेवाग्राम दौडणार आहेत. आठ दिवसांची ढवळे यांची ‘गांधी संदेश दौड’ जालना येथून २५ सप्टेंबर रोजी निघणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दौड समाप्त होणार आहे. सुमारे साडेतीनशे किलोमीटरचे अंतर धावत पार करण्याचा संकल्प ढवळे यांनी केला आहे.
संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीचे हे वर्ष जगभरात मोठ्या प्रमाणात साजरे होत आहे. भारत सरकारनेही अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ब-याच संस्था गांधी विचारांचा प्रसार आणि प्रचाराच्या नियोजनात गुंतल्यात. गांधी विचाराने प्रेरित झालेलेही वैयक्तिक स्तरावर विविध उपक्रम राबवित आहेत. यापैकीच जालन्यातील राजेभाऊ ढवळे आहेत.
मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणा-या ढवळेंना धावण्याचा मोठा अनुभव आहे. मागील तीन वर्षांपासून ते अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. अल्ट्रा मॅरेथॉन सर्वात खडतर स्पर्धा ओळखली जाते. पुणे येथे झालेल्या ७५ कि.मी.अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत जिद्दीच्या जोरावर त्यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला होता.