एस. चैतन्य नूतन पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:51 AM2018-07-29T00:51:41+5:302018-07-29T00:52:17+5:30
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांची बदली झाली आहे. पोकळे यांची मुंबई येथील गुप्तवार्ता विभागात तर फड यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांची बदली झाली आहे. पोकळे यांची मुंबई येथील गुप्तवार्ता विभागात तर फड यांची नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. या बदलीचे आदेश शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाले.
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे चौदा महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांच्या जागेवर रूजू झाले होते. दीड वर्षाच्या अल्प काळात त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबवून मोठे काम केले. शांत आणि मनमिळावू स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अप्पर पोलीस अधीक्षक लता फड या राहुल माकणीकर यांच्या जागेवर दोन वर्षापूर्वी रूजू झाल्या होत्या. या दोन्ही अधिका-यांच्या बदल्यामुळे आता नवा भिडू नवा राज पोलीस दलात होईल.
जालन्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर येथील वाहतूक विभागातील उपायुक्त एस. चैतन्य हे रूजू होणार आहेत. एस. चैतन्य हे मूळचे तामिळनाडू राज्यातील वेल्लूर येथील रहिवासी असून, त्यांनी २०१५ मध्ये आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. चैतन्य हे सोमवारी रूजू होणार असल्याचे सांगण्यात आले.