मंठा येथे बीडीओंच्या कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:28 AM2018-02-10T00:28:08+5:302018-02-10T00:28:13+5:30
मंठा येथील गटविकास अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी तोडफोड केली.या प्रकारामुळे गटविकास अधिकारी कार्यालयात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
जालना : मंठा येथील गटविकास अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी तोडफोड केली.या प्रकारामुळे गटविकास अधिकारी कार्यालयात काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
मंठा तालुक्यात यावर्षी मुबलक पाऊस झालेला नाही. यामुळे अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेचे जिल्हाध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दहा दिवसांपूर्वी गटविकास अधिका-यांना निवेदन देऊन तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. पाणी टंचाई निवारणार्थ कुठल्याही उपाय योजना केल्या नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी गटविकास अधिका-यांच्या कार्यालयात टेबलवरील काच फोडली. तसेच टेबल, खुर्च्यांचे नुकसान केले. कार्यालयीन वेळेत येथे अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळेही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
या प्रकरणी पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी शिवाजी कोरडे यांनी मंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर काकडे, महादेव काकडे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगिर तपास करीत आहेत.