सागर मारकडने मारला सुवर्ण चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:47 AM2018-12-21T00:47:53+5:302018-12-21T00:48:20+5:30
हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने व सळसळत्या चैतन्यपूर्ण वातावरणात पुण्याच्या सागर मारकड याने जालना येथील आझाद मैदानावर जबरदस्त कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा चौकार मारला
जयंत कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने व सळसळत्या चैतन्यपूर्ण वातावरणात पुण्याच्या सागर मारकड याने जालना येथील आझाद मैदानावर जबरदस्त कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा चौकार मारला. सोलापूरचा जोतिबा अटकळे व आशीष वावरे यांनीही आपआपल्या वजन गटात सुवर्णपदक जिंकताना उपस्थितांची मने जिंकली.
५७ किलोच्या माती गटातील अंतिम सामन्यात सागर मारकड याने कोल्हापूरच्या संतोष हिरगुडे याला डोके वर काढण्याची उसंतही मिळू न देता सुरुवातीला दुहेरी पट काढून दोन गुण वसूल केले. त्यानंतर भारंदाज डावावर आणखी २ गुण वसूल करताना सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सागरचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. याआधी त्याने अहमदनगर, वारजे, भूगाव येथेही सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. प्रतिस्पर्ध्यांचे डाव व्हिडिओवर पाहून आपण या स्पर्धेसाठी व्यूहरचना आखली असल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
जोतिबा अटकळे आणि सातारा येथील प्रवीण सूळ या अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांच्या शिष्यात ५७ किलो वजनी गादी गटातील अंतिम फेरीही रंगली. त्यात जोतिबा अटकळे याने दुहेरी पट काढताना प्रत्येकी २ गुण मिळवताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
७९ किलोच्या गादी गटातील अंतिम सामन्यात सोलापूरच्या आशिष वावरे याने पुण्याच्या अक्षय चोरगे यांच्यातील लढत अगदीच एकतर्फी ठरली. आशीषने प्रारंभापासूनच आक्रमक पवित्रा अवलंबताना प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढण्याची उसंत मिळू न देता ४/२ अशी आघाडी घेतली आणि नंतर जोरदार मुळी डाव टाकताना ६ गुण घेताना १0/२ अशा गुणफरकाने अक्षयचा पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. आशिषचे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले. गतवर्षी तो तिसऱ्या स्थानावर होता.
तसेच आॅल इंडिया कुस्ती स्पर्धेतही त्याने कास्यपदक जिंकले आहे. ७९ किलोच्या माती गटाच्या फायनलमध्ये इराण येथील आशियाई स्पर्धेत कास्यपदक जिंकणाºया सोलापूरच्या ११ वी इयत्तेत शिकणाºया व भविष्यात महाराष्ट्र केसरीचा दावेदार मानला जाणारा वेताळ शेळके याने दुहेरीपट आणि इराणी कलंगी डावाचा उपयोग करताना अंतिम सामन्यात उस्मानाबादच्या हनुमंत पुरी याच्यावर मात करीत या वजन गटात विजेतेपद पटकावले.
४ आखाडे अन्
डिजिटल स्कोअरबोर्ड
पहिलीच ‘केसरी’
जालना : येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डिजीटल स्कोअरबोर्ड वापरला जात आहे. असा बोर्ड वापरण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ असून मराठवाड्यात चार आखाड्यावर होणारी ही पहिलीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी यजमानपद जालन्याला देण्यापाठीमागचा उद्देश त्यांनी सांगितला. ते म्हणाले, राज्य व राष्ट्रीय पातळीवर मल्ल घडावे, कुस्तीचा प्रसार व्हावा या उद्देशाने प्रत्येक वर्षी विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीचे आयोजन केले जाते. या वेळी दयानंद भक्त यांच्या मागणीमुळे जालना येथे ही स्पर्धा देण्यात आली आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष अर्जुनराव खोतकर व दयानंद भक्त यांनी या स्पर्धेसाठी चांगले नियोजन केले आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चार आखाड्यावर होण्याची ही मराठवाड्यातील पहिली आणि महाराष्ट्रातील दुसरी वेळ आहे. याआधी पुणे जिल्ह्यातील भूगाव येथे चार आखाड्यावर ही कुस्ती स्पर्धा घेण्यात आली आहे. जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डिजीटल स्कोअरबोर्ड वापरला जात आहे. असा बोर्ड वापरण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे. तसेच या कुस्ती स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपणही यू ट्यूबवर केले जाण्याचीदेखील पहिलीच वेळ आहे, अशी माहितीही बाळासाहेब लांडगे यांनी दिली.