'सगेसोयरे' टिकणार नव्हते तर न्यायाधीश घेऊन कशाला आले होते; मनोज जरांगे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 06:24 PM2024-07-16T18:24:19+5:302024-07-16T18:25:02+5:30
लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण बदलायची आहे, असं पुन्हा बेमुदत उपोषणासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले.
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : 'सगेसोयरे' अधिसूचना कोर्टात टिकली नाही तर दुसरा पर्याय राहत नाही, असे मंत्री शंभूराज देसाई माध्यमांसमोर बोलले होते. यावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टिकणारच आहे ना, ते टिकणार नाही तर न्यायाधीश कशाला आणले होते? ते टिकणार नाही असं मी म्हणालो होतो, म्हणून तुम्ही न्यायाधीश आणले होते ना? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. तुम्ही म्हणत असाल टिकत नाही, तर आमची मूळ मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ती पूर्ण करा असेही जरांगे म्हणाले.
२० तारखेला बेमुदत उपोषण करू नये, अशी समाजाची भावना आहे. समाजाची माया आहे, प्रेम आहे मी ते कधीच विसरणार नाही. मी त्यांचा शब्द डावलतोय अस नाही. शेवटी त्यांचा शब्द कशासाठी डावलतो यालाही महत्त्व आहे. बेमुदत उपोषण हीच माझी शक्ती आहे. लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण बदलायची आहे, असं पुन्हा बेमुदत उपोषणासंदर्भात जरांगे पाटील म्हणाले.
मी काही कोणाची सुपारी घेतली नाही
ते प्रत्येक सभेमध्ये माझ्यावर टीका करतात असे, गिरीश महाजन म्हणाले होते, यावर जरांगे म्हणाले, तुम्हाला बोललो होतो. तुमच्याशी आमची नाराजी असण्याचे काही कारण नाही. मी फक्त म्हणलो आरक्षण टिकणार द्यावं, म्हणून त्यांना माझा राग आलेला दिसतो. तुमच्यावर टीका करावी हा माझा धंदा नाही. मी काय कोणाच्या सुपाऱ्या घेत नाही, असे प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी महाजन यांना दिले.
... तर सरकारसोबत चर्चा करू
गिरीश भाऊ तुम्हीच ठरवायला होतात. सगेसोयऱ्यासाठी तुम्हीच न्यायाधीश आणले होते. तुम्ही म्हणालात सगेसोयरेची अंमलबजावणी केली तरी टिकणार नाही. म्हणून तुम्ही फक्त खरं बोला. आम्ही पुन्हा तुमच्याशी अंतरवाली सराटीत चर्चा करायला तयार आहोत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकार सोबत चर्चेचे दार खुले असल्याचे संकेत दिले.