सग्या-सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही : मनोज जरांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 06:06 AM2024-02-19T06:06:38+5:302024-02-19T06:06:57+5:30
जरांगे-पाटील म्हणाले, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नवे आरक्षण असेल असा गैरसमज काढून टाका, मराठे ओबीसीमध्ये आहेत.
वडीगोद्री (जि. जालना) : येत्या २० तारखेला कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्या शिवाय आंदोलन थांबणार नाही, सगेसोयरे कायद्याबाबत सध्या सरकारने स्पष्टता केलेली नाही. यामुळे सरकारने कायदा निर्मितीची प्रक्रिया थांबवू नये, असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले. रविवारी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना नवे आरक्षण असेल असा गैरसमज काढून टाका, मराठे ओबीसीमध्ये आहेत. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी. मराठा समाजासाठी जे येईल त्याचे स्वागतच केले आहे. उद्या शिवरायांची जयंती आदर्श व्हायला पाहिजे. समाजबांधवांनी जयंती शांततेत साजरी करावी. २० फेब्रुवारीला संध्याकाळी किंवा २१ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा रवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.