साहेब... आमच्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याकडं बी बघा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:39 AM2019-06-07T00:39:53+5:302019-06-07T00:40:10+5:30
दुष्काळात पाणी आणण्यासाठी शिवसेनेने जसे चांगले प्रयत्न केले, त्यामुळे तर आम्ही समाधानी झालो आहोतच, परंतु आता आमच्या शाळेत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण करा अशी आर्त हाक दहीफळ-काळे येथील विद्यार्थिंनीनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना घातली.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुष्काळात पाणी आणण्यासाठी शिवसेनेने जसे चांगले प्रयत्न केले, त्यामुळे तर आम्ही समाधानी झालो आहोतच, परंतु आता आमच्या शाळेत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण करा अशी आर्त हाक दहीफळ-काळे येथील विद्यार्थिंनीनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना घातली.
खोतकर तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर हे आज जलपूजना निमित्त जालना तालुक्यातील दहीफळ येथे आले असतांना विद्यार्थिंनी तसेच त्यांच्या पालकांनी खोतकर यांना जलपूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी ही मागणी केली.
शिवसेनेकडून दुष्काळाचा महामुकबला अंतर्गत मानेगाव जहागीर, दहीफळ तसेच परिसरातील अन्य गावांमध्ये जालन्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने नवीन बोअरवेल घेणे, आहे त्या हातपंपावर विद्युत मोटार बसविणे, प्लास्टिकच्या टाक्यांचे वाटप करून मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.
ही कामे पूर्ण झाल्यावर त्यांच्या लोकापण सोहळ्यासाठी गुरूवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हा प्रमुख पंडित भुतेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज वरील गांवाचा दौरा केला.
शिक्षणासाठी मोतीगव्हाणला पायपीट
दहिफळ काळे येथील जलपूजनाच्या कार्यक्रमात सुषमा काळे, ऋतुजा काळे, निमाली काळे, श्रध्दा काळे, जयश्री काळे यांच्यासह या गावातील महिलांनी खोतकरांची भेट घेतली. येथील मुलींना शालेय शिक्षणासाठी मोतीगव्हाण येथे जावे लागते.
पावसाळ्यात हा तीन किलो मीटरचा रस्ता पूर्ण चिखलमय होतो. त्यामुळे शाळेत जाणे कठीण होऊन बसते. तसेच शाळेत जाण्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था नसल्याने चार महिने आमच्यासाठी मोठे जिकिरीचे ठरतात असे नमूद केले.
यावेळी हा रस्ता चांगला करून देण्यासह बस सोडता आली तर त्याकडेही लक्ष द्यावे अशी विनंती खोतकरांना केली. आपण यात निश्चित लक्ष घालून तो रस्ताही चांगला करून देऊ असे खोतकरांनी सांगितले.