पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिलेकडून मुलीची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:43 AM2017-10-02T00:43:41+5:302017-10-02T00:45:03+5:30
जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका शिपाई महिलेने अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये अडीच लाखांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा. बांधकाम विभाग क्वॉर्टर्स) हिच्यासह सुजितकुमार मोतीलाल लोहार (रा.वृषभदेव. जि. उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे.
जालना : येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका शिपाई महिलेने अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये अडीच लाखांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी राधिका छत्तरसिंग हिवाळे (रा. बांधकाम विभाग क्वॉर्टर्स) हिच्यासह सुजितकुमार मोतीलाल लोहार (रा.वृषभदेव. जि. उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले, पोलीस प्रशिक्षण केंद्रात काम करणाºया राधिका छत्तरसिंग हिवाळे हिच्याकडे पिडीत मुलगी कामानिमित्त येत असे. राधिकाने आठवडाभरापूर्वी या मुलीस विक्री करण्याच्या उद्देशाने फूस लावून पळविले. तिने सुरुवातीला पीडित मुलीला औरंगाबाद येथील एका व्यक्तीस दाखविले. मात्र, पसंत नसल्याचे सांगत त्या व्यक्तीने नकार दिला. त्यानंतर ती पीडितेला पुण्यातील एका व्यक्तीकडे घेऊन गेली. मात्र, आर्थिक देवाण-घेवाणीतून तोही सौदा फिस्कटला. एवढ्यावर न थांबता राधिकाने ओळखीच्या व्यक्तीच्या मध्यस्थीने पीडितेस थेट राजस्थानमधील सुजितकुमार मोतीलाल लोहार यास अडीच लाखांत विकले. सुजितकुमारने वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने जबाबात म्हटले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद, पुणे, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये जाऊन अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. सुजितकुमार मोतीलाल लोहार यास शुक्रवारी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला वडिलांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या महिलेलाही अटक केली. दोघांनाही रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे, यशवंत जाधव, उपनिरीक्षक सुधीर त्रिनेत्रे, अर्जुन पवार, संदीप बेराड, अंबादास दांडगे, ज्योती राठोड यांनी ही कारवाई केली.
मुली विकणारे रॅकेट?
अशा प्रकारे मुलींची विक्री करणारे रॅकेट असण्याची शक्यता असून, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी व्यक्त केली. पोलिसांनी आठवडाभरात २२०० किलोमीटरचा प्रवास करत पीडितेची सुटका करून आरोपींना अटक केल्याचे त्यांनी सांगितले.
राधिकावरच होता संशय !
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील शिपाई राधिका छत्तरसिंग हिवाळे हिच्याकडे पीडित अल्पवयीन मुलगी कामाला असल्याने तक्रार करताना वडिलांनी राधिकावरच संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीलाच राधिकाला ताब्यात घेऊन चौकशीही केली होती. शुक्रवारी मुलीने जबाबात सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी शनिवारी तिला अटक केली.