समर्थ रामदास स्वामींचे 'देव' अद्याप सापडेनात; ग्रामस्थांनी सुरू केले अन्नत्याग आंदोलन

By दिपक ढोले  | Published: August 24, 2022 02:11 PM2022-08-24T14:11:51+5:302022-08-24T14:15:43+5:30

श्रीराम मंदिरातून श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमानाच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी

Samarth Ramdas Swamy's 'Idol' is yet to be found; One day Annatyag agitaion of villagers in Jambsamartha | समर्थ रामदास स्वामींचे 'देव' अद्याप सापडेनात; ग्रामस्थांनी सुरू केले अन्नत्याग आंदोलन

समर्थ रामदास स्वामींचे 'देव' अद्याप सापडेनात; ग्रामस्थांनी सुरू केले अन्नत्याग आंदोलन

Next

कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील सहा मूर्ती सोमवारी चोरीला गेल्या होत्या. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आली. दरम्यान, मूर्तीचा शोध तत्काळ घेण्यात यावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी मंदिर परिसरात आज सकाळपासून एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. 

तीर्थक्षेत्र जांबसमर्थ हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. येथील जांबसमर्थ मंदिर, श्रीराम मंदिरात इ.स. १५३५ मधील श्री राम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्ती होत्या. विशेषत: श्री समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास या श्रीराम मंदिरातून श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमानाच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे. हा प्रकार सकाळी समोर आल्यानंतर मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली होती. दरम्यान, मंगळवारी मूर्तीविनाच मंगळवारी आरती झाल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली. गावात दिवसभर शांतता दिसून आली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. दरम्यान, आज ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. 

मंदिर दर्शनासाठी खुले
चोरी गेलेल्या मूर्तींचा अद्यापही शोध लागला नाही. सोमवारी रात्री समर्थ रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज भूषण स्वामी ठोसर यांनी मंदिरात श्रीरामांची प्रतिमा ठेवून मंदिर दर्शनासाठी खुले केले आहे.

सहा पथके मागावर : चार जणांची चौकशी
मूर्तींची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यासाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास एक कार गावाच्या परिसरात फिरत होती. त्याची चौकशी केली असता, त्यात उस्मानाबाद येथील काही लोक असल्याचे पोलिसांना समजले. त्यांची चौकशी करण्यात आली आहे.

Web Title: Samarth Ramdas Swamy's 'Idol' is yet to be found; One day Annatyag agitaion of villagers in Jambsamartha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.