सर्वेक्षणानंतरच वाळूचे लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:10 AM2020-02-07T01:10:30+5:302020-02-07T01:10:46+5:30
राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यावरच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाळू आणि खडी टंचाईमूळे बांधकाम व्यवसाय धोक्यात आला आहे. वाळू पट्ट्यांचे लिलाव रखडल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केल्याने आता भूजल सर्वेक्षण विभागाने ज्या नद्यांमधून वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशा वाळू घाटांचे खाजगी एजंन्सीकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही सर्वेक्षण एजन्सी कोणत्या वाळू घाटांमधून किती वाळू उपसावी याचे विवरण गौण खनिज विभागाला देईल. त्यानंतर हे प्रकरण मंजुरीसाठी राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यावरच वाळू घाटांचे लिलाव होणार आहेत.
गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात वाळू तसेच खडीची टंचाई निर्माण झाली आहे. मध्यंतरी अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठल्याने विभागीय आयुक्तांनी या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली. त्या नंतर अवैध वाळू उपसा आणि त्याच्या वाहतुकीवर बराच फरक पडला आहे. असे असले तरी वाळू माफियांकडून सद्यस्थितीत अधिकारी तसेच पोलिसांना हाताशी धरून चढ्या भावाने वाळूचे ट्रक, टिप्पर विक्री होत आहे. सध्या शासनाकडून पर्यावरण संवर्धनाला मोठे महत्व दिले जात आहे. त्यामूळे अवैध वाळू उत्खननावर बारीक लक्ष असून, ते जो पर्यंत संपूर्ण वाळू घाटांचे लिलाव होणार नाहीत, तो पर्यंत असेच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यात जानेवारी महिन्यात अवैध उत्खनन व वाहतुकीची २३१ कारवाया केल्या आहेत. या कारवाईत संबंधितांना ४ कोटी ८५ लाख १० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, १ कोटी ४४ लाख ३४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात जालना तालुक्यात १७ कारवाया करून ३३ लाख ५६ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पैकी २१ लाख ९९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बदनापूर केलेल्या १३ कारवायांमध्ये २४ लाख ७० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला असून, ९ लाख ३६ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. भोकरदन २२ कारवाया करण्यात आल्या आहेत. यात ४५ लाख ६३ हजाराचा दंड आकारण्यात आला असून, यातील १८ लाख २१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
५६ प्रकरणांत गुन्हे दाखल
वाळू उत्खनन, वाहतूक प्रकरणात जिल्ह्यात ५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जालना तालुक्यात २, भोकरदन तालुक्यात ३, जाफराबाद तालुक्यात ५, परतूर तालुक्यात २, मंठा तालुक्यात १, अंबड तालुक्यात ३६ तर घनसावंगी तालुक्यातील ७ प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१०५ वाहने जप्त
जिल्हा खनिकर्म अधिकारी विभागाने केलेल्या कारवाईत आजवर १०५ वाहने जप्त करण्यात आले आहेत. यात परतूर तालुक्यात १८, अंबड तालुक्यात ८७ असे एकूण १०५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पथकावरही झाला हल्ला
अवैध वाळू तस्करांविरूध्द प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यात कारवाईवेळी जाफराबाद तालुक्यात एका पथकावर हल्ला झाला आहे. या प्रकरणात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.