कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:48 AM2019-12-19T00:48:56+5:302019-12-19T00:49:21+5:30
कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथे घडली. या हल्ल्यात वाळू माफियांनी महसूलच्या वाहनाचे मोठे नुकसान केले आहे.
परतूर तालुक्यतील कसुरा नदी पात्रातून अंगलगाव वाळू पट्ट्यातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती परतूर येथील महसूलच्या पथकाला मिळाली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास महसूलचे पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र, या वाळू माफियांनी चक्क पथकावरच हल्ला चढविला. पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण करून, तहसीलदार यांचे वाहन उलथून टाकले. वाहनाची तोडफोड केली. पथकातील तलाठी अधिक यादव, पंडित काकडे, रवी रेड्डी, मुकुंद डोल्हारकर, चालक अतिक या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, ही घटना परतूर हद्दीत घडली. मोडतोड केलेले शासकीय वाहन सेलू हद्दीत नेऊन टाकण्यात आले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.