जोगलादेवीत वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:31 AM2018-08-23T00:31:34+5:302018-08-23T00:31:50+5:30
घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेली साडेचार हजार ब्रास वाळू जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेली साडेचार हजार ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई बुधवारी तहसीलदार संजयकुमार ढवळे यांनी केली. त्यानंतर पाहणी करून ही वाळू जप्त करण्यात आली.
गोदावरीत पाणीसाठा नसल्याने गोदाकाठच्या रामसगाव, जोगलादेवी, शेवता, बानेगाव, लिंगसेवाडी, भोगाव, मंगरूळ इ. गावांतून सर्रासपणे अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात आहे. ही माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांनी लेखी स्वरुपात घनसावंगीच्या तहसीलदारांना कळविले. यामध्ये कारवाईसंदर्भात सुचविले होते. हे पत्र मिळताच बुधवारी घनसावंगीचे प्रभारी तहसीलदार संजयकुमार ढवळे, तलाठी के.एस.घारे, चार कोतवाल, दोन शस्त्राधारी पोलीस यांचे पथक जोगलादेवी पोहोचले. येथे पाहणी केली असता ३० ते ४० साठे आढळून आले. केवळ येथे जवळपास साडेचार ते पाच हजार ब्रास वाळू होती. त्यातील लिलाव झालेल्या पण न उचललेली अंदाजे २२०० ब्रास बाळू साठा सोडला तर जवळपास अडीच हजार ते २८०० ब्रास वाळूचे पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. यामुळे वाळू साठा करणारे आणि वाळू वाहतूकदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.