वाळूतस्करांचा पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 01:04 AM2018-09-23T01:04:49+5:302018-09-23T01:05:22+5:30
वाळकेश्वर ता.अंबड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ अवैध वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रसंगावधान दाखवून पोलिसांनी तेथून वेळीच स्वत:ला सावरल्याने या हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : वाळकेश्वर ता.अंबड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ अवैध वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रसंगावधान दाखवून पोलिसांनी तेथून वेळीच स्वत:ला सावरल्याने या हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा करून त्याची वाहतूक केली जाते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल तसेच पोलीस प्रशासन प्रयत्नशील असतात. शनिवारी दुपारी वाळकेश्वर परिसरातून अवैध वाळूची तस्करी केली जात होती. या वाळू तस्करांना पोलीसांनी हटकले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
यावेळी नदी पात्रात दहा ट्रॅक्टर होते. त्यापैकी चार ट्रॅक्टर मिळेल त्या दिशेने पळून गेले. तर उर्वरित सहा ट्रॅक्टर पोलीस जप्त करून नेत असतांना त्यांच्यावर आठ ते दहा जणांनी हल्ला केला.
यातील काही जणांनी पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीसांनी दिली. अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावरून गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल परजने, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहाय्यक फौजदार सय्यद नसीर, पो.कॉ.महेश तोटे, गणेश बुजाडे, ज्ञानेश्वर मराडे, अशोक भांगल यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रकरणी गोंदी पोलीसांनी आठ ट्रॅक्टरचालकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.