एक लाख ४५ हजार रुपयांचे चंदन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:05 AM2019-04-08T00:05:35+5:302019-04-08T00:05:56+5:30
भोकरदन तालुक्यातील पारध ते पद्मावती रस्त्यावरील इंगळेवाडी येथे शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा मारून एक लाख ४५ हजार रूपयांचे ८५ किलो चंदनाचे लाकूड जप्त केले आहे.
लोकमत् न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध ते पद्मावती रस्त्यावरील इंगळेवाडी येथे शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा मारून एक लाख ४५ हजार रूपयांचे ८५ किलो चंदनाचे लाकूड जप्त केले आहे.
भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांना रविवारी इंगळेवाडी येथून चंदनाची वाहतुक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरून त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा मारला. यावेळी पोलिसांना एका नाल्यात ताजखा भिकनखा पठाण (वय- ४४, रा. नूतन कॉलनी, नवे भोकरदन) हा आढळून आला. त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विक्री करण्यासाठी असलेले एक लाख ४५ हजार रूपयांचे ८५ किलोचे चंदन आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. पारध पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पारध पोलीस ठाण्याचे सपोनि. शंकर शिंदे, उप निरीक्षक प्रदीप उबाळे, पोहेकॉ. गीते, नारायण माळी, सुरेश पडोळ, किशोर मोरे, रामेश्वर सिनकर, जगदीश बावणे, गणेश पायघन, सागर देवकर, निलेश फुसे, लक्ष्मण वाघ आदींनी केली. पुढील तपास सपोनि. शिंदे करित आहेत.