दरेगाव येथील ड्रायपोर्ट कामाची आज संजय सेठी करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:09 AM2020-01-15T01:09:28+5:302020-01-15T01:10:46+5:30
दरेगाव परिसरातील ४०० एकरावर २०१५ पासून ड्रायपोटची उभारणी केली जात आहे या कामाची जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे बुधवारी पाहणी करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील दरेगाव परिसरातील ४०० एकरावर २०१५ पासून ड्रायपोटची उभारणी केली जात आहे. या ड्रायपोर्टमुळे संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना लाभ होणार आहे. या कामाची जेएनपीटीचे (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) अध्यक्ष संजय सेठी हे बुधवारी पाहणी करणार आहेत.
मराठवाड्यातील वेगवेगळी उत्पादने यापूर्वी थेट निर्यात करण्यासाठी मुंबई येथील जेएनपीटी बंदरामध्ये न्यावी लागत होती. तेथे माल गेल्यानंतर वेगवेगळ्या तपासण्या, कस्टम क्लिअरन्ससाठी वेळ जात होता. हा वेळ वाचिवण्यासाठी जालना तालुक्यातील दरेगाव येथे ड्रायपोर्टची उभारणी करण्याची घोषणा करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तत्कालीन भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. यासाठी ५०० एकर जागा संपादित करण्यात आली आहे. दरेगाव येथून जवळच असलेल्या दिनेगाव रेल्वे स्टेशनसाठी नवीन रेल्वे रूळ टाकून हे स्टेशन ड्रायपोर्टला जोडण्यात येणार आहे. जेणेकरून येथून माल मुंबईपर्यंत रेल्वेने नेण्यास मदत होणार आहे. तसेच नांदेड, हैदराबाद येथून परदेशात निर्यात केला जाणारा माल येथे आणता येणार आहे. जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे हे या कामावर लक्ष ठेवून आहेत. आजवर ५०० एकर जमिनीला कम्पाऊंड वॉल करण्यात आली आहे. या कामाला गती यावी, कोणत्या अडचणी आहेत व त्या सोडविण्यासाठी कोणत्या उपायोजना कराव्या लागणार, याची ही पाहणी करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाहणी करण्यासाठी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे बुधवारी येणार आहेत.