सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:09 IST2024-12-31T17:09:23+5:302024-12-31T17:09:47+5:30
धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगे यांची भेट

सरपंच संतोष देशमुख यांचे कुटूंब दहशती खाली, त्यांना पोलिस संरक्षण द्या: मनोज जरांगे
वडीगोद्री ( जालना) : ''तुम्ही कोणालाच सोडू नका. मराठा समाज न्यायासाठी डोळे लावून बसला आहे'', असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाल्मीक कराड यांच्या सरेंडरनंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. सरपंच देशमुख यांचे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. ते दहशती खाली आहेत. त्यांच्या घराला पूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणीही जरांगे यांनी केला.
मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख हे प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेटी नंतर मनोज जरांगे पाटील व धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, न्याय देण्याचे काम फडणवीस साहेबांनी करावे. सर्व आरोपी धरावे, सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. वाल्मीक कराड दोन महिन्यापासून कोणाकोणाशी बोलला. कोणत्या मंत्र्याशी बोलला, त्याचे कॉल डिटेल्स काढले पाहिजे, त्या सर्व लोकांना आत टाकलं पाहिजे. सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल करू नये, यातील एकही माणूस सुटू नये, यासाठी उज्वल निकम यांची विशेष सरकारनी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी अशी मागणी जरांगे यांनी केली.
वाल्मीक कराड कसं ठरवल आरोपी नाहीत म्हणून, न्यायदेवता ठरवल : धनंजय देशमुख
सरकारने वाल्मीक कराड सोबतचे सर्व आरोपी शोधावे. सीडीआर काढून जे कोणी दोषी असेल त्यांना ताब्यात घ्यावे. सरकारने लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा. वाल्मीक कराड खुनाच्या प्रकरणात आरोपी नाहीत हे कसे ठरवले, असा सवाल जरांगे यांनी केले. न्यायदेवता ठरवल आरोपी कोण आहे ते, सत्य समोर येणार थोडा वेळ जाईल, सीआयडीचा प्रामाणिक प्रयत्न आहेत. त्यामुळे आज आरोपी जेरबंद झाला अशी प्रतिक्रीया धनंजय देशमुख, मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी दिली ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी दुपारी अंतरवाली सराटीत आले होते.