सचिन मोरे यांना सरपंच आॅफ द इयर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:07 AM2019-02-27T01:07:41+5:302019-02-27T01:07:48+5:30
यंदाचा सरपंच आॅफ द इयरचा पुरस्कार गोलापांगरीचे सरपंच सचिन प्रल्हादराव मोरे यांना प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संपूर्ण राज्य आणि जिल्हाभरात उत्सुकता लागलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डचे सोमवारी दुपारी शहरातील मधुर बॅक्वेट हॉलमध्ये थाटात वितरण झाले. यंदाचा सरपंच आॅफ द इयरचा पुरस्कार गोलापांगरीचे सरपंच सचिन प्रल्हादराव मोरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी गावाच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या १२ सरपंचांनाही गौरविण्यात आले.
गाव करी तो राव काय करी..अशी एक म्हण आहे. जर गावाने ठरवले तर त्या गावाचा विकास कोणीच रोखू शकत नाही. परंतु हा विकास करताना कोणीतरी कप्तान हवा असतो. आणि गावाचा कप्तान म्हणजे त्या गावाचा सरपंच असतो. १४ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायत सदस्यांना महत्व प्राप्त झाले आहे. वित्त आयोगाचा निधी आता थेट त्या ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होत आहे. यामूळे जिल्हा परिषदेपेक्षाही ग्रामपंचायतीला महत्व प्राप्त झाले आहे. आणि त्यातच सरपंचाचे महत्वही यामुळे वाढले असून, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
आधुनिकीकरण होत असताना खेडी ओस पडत आहे. शेतीची अवस्था बिकट झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचाही मोठा फटका जनजीवनावर झाला आहे. विकास करतांना आपले मूळ जपणेही आवश्यक असल्याचा सूर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
लोकमत, बीकेटी आणि पतजंलीतर्फे आयोजित सरपंच अवॉर्ड वितरणाचे हा रंगारंग कार्यक्रम सोमवारी पार पडला. येणाऱ्याचे स्वागत तुतारीच्या निनादाने आणि औक्षण करून केले जात होते. येणा-या प्रत्येक सरपंचाच्या चेह-यावर एक वेगळाच उत्साह दिसून आला. प्रारंभी लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांनी प्रास्तविक केले. त्यांनी या सरपंच अवार्डचे महत्व विशद करून सांगितले आणि लोकमतने हा उपक्रम कशामुळे सुरू केला याची माहिती दिली. या पुरस्कार सोहळ्यात महिला सरपंचानीही बाजी मारल्याचे दिसून आले. महिलांच्या सहभागाबद्दल त्यांचे यावेळी कौतुक करण्यात येत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फळबाग तज्ज्ञ तथा गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, कृषीभूषण उध्दव खेडेकर, कृषीभूषण भगवान काळे, कृषीभूषण सीताबाई मोहिते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, शाखा व्यवस्थापक मकरंद शहापुरकर, जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केलीे. यावेळी औरंगाबाद येथील इव्हेंट विभागाचे तनुजा भालेराव, शैलेश देशमुख, अभय भोसले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुकुंद टोणपे, नरेश कोरडे, संतोष मापारी, गजानन वानखडे, दीपक ढोले, विकास व्होरकटे, बाळासाहेब सुतार, गुलाब साळुंके, रवी आंबेकर, जिया सौदागर, शरद घुले, नागेश बरसाले आदींनी प्रयत्न केले.