‘सरजमीन’ ने जागले देशभक्तीचे स्फुल्लिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:27 AM2018-01-28T00:27:57+5:302018-01-28T00:28:37+5:30
येथील रोटरी परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सरजमीन’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जालना : येथील रोटरी परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सरजमीन’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील दहा हजारांवर नागरिकांनी हजेरी लावून देशभक्तीची भावना जागृती केली.
आठवडाभरापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या तयारीचा प्रत्यक्ष अनुभव जालनेकरांनी प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी घेतला. दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी केलेली भव्य बैठक व्यवस्था, अचूक नियोजन, अत्याधुनिक साऊंड व्यवस्था, भव्य स्टेज, लाईट्स आणि कोलकाता येथील समन्वय समवेत गु्रपच्या ८० सदस्यांनी देशभक्तीपर गीतांवर एक तास ५० मिनिटे सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. रोटरीच्या पदाधिका-यांनी कार्यक्रमाचा उद्देश व संकल्पना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सृष्टी निर्मितीवर आधारित ‘ओम’ उच्चारणाचे गीत सादर करण्यात आले. १८५७ चा झालेला उठाव, ब्रिटीश साम्राज्याचा उदय यात मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई यांनी दिलेला लढा, स्वदेशी आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन या ऐतिहासिक घटनांवर आधारित गीते आणि त्यावर सादर करण्यात आलेले प्रासंगिक नृत्याने वातावरण अधिकच भारावून गेले. दे दी हमे आझादी, बिना खडक, बिना ढाल, अब तुम्हारे हवाले वतन साथियो , ये मेरे वतन के लोगो आदी या गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. ‘संदेसे आते है, हमे तडपाते है’ या गीताने सीमेवर देशासाठी लढणा-या जवानांची कुटुंबियांप्रती असलेले प्रेम भावना दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समन्वय समवेत गु्रपचे प्रमुख कमल गांधी यांनी ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश, त्यातून शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी केलेली मदत याबाबत माहिती दिली.
------------
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्यासह औरंगाबाद लष्करी छावणीचे मुख्य अधिकारी कमांडर डी.के. बत्रा, रामेश्वर शर्मा, पी. व्यंकटेश, एस.के.घोष, लाँगनाथम, विविध विभागांचे अधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, उद्योजक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-----------
नियोजनाची प्रशंसा
कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता आयोजकांच्या वतीने अगदी पार्किंग व्यवस्थेपासून चोख नियोजन केले होते. आसनावर प्रत्येकासाठी एक तिरंगा झेंडा, अल्पोपाहार, पाणी कचरा गोळा करण्यासाठी स्वयंसेवक, महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृह याची उत्तम व्यवस्था कार्यक्रमस्थळी होती.