सत्संग हा सुखी जीवनाचा मार्ग- भगवान महाराज आनंदगडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:35 AM2018-12-17T00:35:56+5:302018-12-17T00:36:10+5:30
सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संसार मुळीच दु:खदायी नाही. मात्र आपल्या कमार्नं त्याला दु:खी बनवलं असून यातून मुक्ती हवी असेल सत्संगाशिवाय पर्याय नाही. कारण सत्संग हाच सुखी जीवनाचा खराखुरा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द कीर्तनकार हभप भगवान महाराज आनंदगडकर यांनी केले.
जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथील माऊलीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील काल्याच्या कीर्तनात निरुपण करताना हभप आनंदगडकर महाराज बोलत होते.संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील, पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाचीया पोरे । आधी चोरी केली खरे ।। या अभंगावर आनंद गडकर महाराजांनी सुंदर असे विवेचन केले. पुढे ते म्हणाले की, संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र खरे तर इतके खडतर होते की आपण त्याची कल्पनाही करु शकत नाहीत. मात्र आजकाल आपणासारखे तर इतके दु:ख सहनही करु शकत नाही. संत संगत ही नेहमीच चांगला रस्ता दाखवणारी आहे. म्हणूनच आपणही याच मार्गाचा स्वीकार केला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की, नंदाच्या मुलांनी चोरी केली म्हणून आपणही चोरी करावी, हे बरोबर नाही. ती संत महंत मंडळी होती, महान होती. त्यांनी खोडकरपणा म्हणून अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या मात्र आपण असला प्रकार करता कामा नये, त्यात यश नव्हे तर अपयशच येते, असेही शेवटी भगवान महाराजांनी सांगितले. गेले सप्ताहाभर दररोज काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, विष्णू सहस्त्रनाम आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच दररोज सायंकाळी हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.
हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी हभप सोपान महाराज डोंगरे, ह. भ. प. नाना महाराज पोखरीकर, सावळेश्वर भजनी मंडळ आदींसह माऊलीनगर वासियांसह गावक-यांनी परिश्रम घेतले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.