जालना जिल्ह्यात श्रावणसरींवर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:43 AM2019-08-09T00:43:26+5:302019-08-09T00:43:39+5:30
जालना जिल्ह्यातील गुरुवारी सर्वांना दमदार पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु श्रावणसरींवरच समाधान मानण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील गुरुवारी सर्वांना दमदार पाऊस पडेल, अशी आशा होती. परंतु श्रावणसरींवरच समाधान मानण्याची वेळ आली आहे. दिवसभर रिमझिम पाऊस पडल्याने जल प्रकल्पांना दमदार पावसाची आस कायम आहे.
जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गुरूवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात ९.५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्मिती होत असून, कमी- अधिक प्रमाणात रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला असला तरी पाणीटंचाई निवारण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ९.५३ मिमी पाऊस झाला. यात जालना तालुक्यात ३ मिमी, बदनापूर २.८० मिमी, भोकरदन ११.६३ मिमी, जाफ्राबाद ८.४० मिमी, परतूर १९.६४ मिमी, मंठा ४.५० मिमी, अंबड १२.४३ मिमी तर घनसावंगी तालुक्यात १३.८६ मिमी पाऊस झाला. गुरूवारी जालना शहरासह परतूर, आष्टी, जाफराबाद, पारध, वालसावंगी, भोकरदनसह जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस झाला. दरम्यान, या पावसामुळे परतूर शहरातील सखल भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते.
परतूरमध्ये २० मिमी पाऊस
परतूर : परतूर तालूक्यात सरासरी पावासाची नोंद २० मी.मी. झाली आहे. दुसऱ्या दिवशी गुरूवारीही पाऊस झाला. यात आष्टी महसूल मंडळात सर्वाधिक ३० मिमी, वाटूर ४ मिमी, परतूर २५ मिमी, आष्टी २४ मिमी, सातोना १५ मिमी असा एकूण १९.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
या पावसामुळे शहरातील रस्ते चिखलमय झाले होते. रस्त्याची दुरूस्ती न झाल्याने शहरवासियांमधून नाराजी व्यक्त होत आहे. चिखलातूनच सर्वांना वाट काढावी लागत आहे.