वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाओ’चा लढा; जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:33+5:302021-09-24T04:35:33+5:30
जालना : वंशाचा दिवा म्हणून मुलाचा जन्म व्हावा यासाठी अनेक पालकांचा ओढा आजही कायम आहे. परिणामी जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर ...
जालना : वंशाचा दिवा म्हणून मुलाचा जन्म व्हावा यासाठी अनेक पालकांचा ओढा आजही कायम आहे. परिणामी जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर गत काही वर्षांत कायम कमी असून, त्यात वाढ होताना दिसत नाही.
मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी शासनाकडून एक ना अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. गर्भलिंग निदान करण्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. मुलींचा जन्म व्हावा, यासाठी विविध प्रशासकीय पातळीवरूनही जनजागृती केली जात आहे. असे असले तरी मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे सरासरी ९०५ ते ९०७ यावर कायम असल्याचे दिसत आहे.
लिंग निदानास बंदी
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच लिंग निदानास कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी विशेष पथकामार्फत सोनोग्राफी सेंटरचीही तपासणी केली जाते. यात कायदेशीर बाबींची पडताळणी होते.
जनजागृतीवर भर
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांची विविध प्रशासकीय विभागामार्फत अंमलबजावणी केली जात आहे. शिवाय आगामी काळात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी अधिक प्रमाणात जनजागृती केली जाईल.
- डॉ. विवेक खतगावकर
मुला-मुलींच्या जन्माची संख्या
२०१५-१६ १२७२१
२०१६-१७ १३५४६
२०१८-१९ १४८३५
२०१९-२० १३९९८
२०२०-२१ ११३६६