मामा-काका वाचवा! पप्पा अन् भाऊ बुडताहेत; चिमुरड्यांचा मदतीसाठी टाहो, पण सारे व्यर्थ ठरले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:07 PM2022-04-28T18:07:35+5:302022-04-28T18:07:59+5:30
वडिलांसह तिन्ही मुले अंघोळ करण्यासाठी मोती तलावात आले होते.
- दीपक ढोले
जालना : पोहण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना जालना शहरातील मोती तलावात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. माणिक बापूराव निर्वळ (३८), आकाश माणिक निर्वळ (१४, दोघे रा. चंदनझिरा, मूळ गाव धर्मापुरी, परभणी) अशी मयतांची नावे आहेत. वडील व भाऊ पाण्यात बुडल्याचे पाहताच सोबत आलेल्या दोन्ही भावडांनी घराकडे धाव घेतली. धावत धावत घर गाठले. धापा टाकत टाकत ते म्हणाले, दादा... दादा, पप्पा अन् भाऊ पाण्यात बुडताहेत, लवकर चला त्यांना वाचवायला. असे म्हणताच नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.
माणिक निर्वळ हे परभणी जिल्ह्यातील धर्मापुरी येथील रहिवासी आहे. हाताला काम नसल्याने ते काही वर्षांपूर्वी पत्नी व तीन महिलांसह शहरातील एमआयडीसी परिसरात आले. एका कंपनीत काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी मंठा येथील नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी ते गेले होते. मंगळवारी दुपारी ते घरी आले. चार वाजेच्या सुमारास वडिलांसह तिन्ही मुले अंघोळ करण्यासाठी मोती तलावात आले. माणिक निर्वळ व आकाशला थोडेफार पोहणे येत होते, तर रोहित व विकीला पोहता येत नसल्याने ते तलावाच्या काठावरच थांबले. आकाश पोहत पोहत पुढे गेला. तेवढ्यात त्याचा पाय खड्ड्यात पडला. तो बुडत असतांनाच वडील त्याला वाचविण्यासाठी गेले. परंतु आकाशने वडिलांना मिठी मारली. नंतर दोघेही पाण्यात बुडाले.
आपले वडील व भाऊ पाण्यात बुडतांना पाहताच रोहित व विकीने घराकडे धाव घेतली. धावत धावत अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले घर गाठले. धापा टाकत टाकत ते म्हणाले, दादा... दादा, पप्पा अन् भाऊ पाण्यात बुडताहेत, लवकर चला त्यांना वाचवायला. असे म्हणताच नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमक दलाच्या जवानांना बोलावून मृतदेह बाहेर काढले. बहिणींनी भावाचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. पोलिसांनी नातेवाइकांना बाजूला करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.