सव्वालाख शेतकरी पीकविम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:03 AM2019-06-17T00:03:50+5:302019-06-17T00:04:17+5:30
पीकविमा मंजूर होऊन महिनाभराचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही सव्वालाखावर शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खरीप हंगाम २०१८ मधील पिकाच्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ६५ कोटी रूपयांचा पीकविमा मंजूर आहे. पीकविमा मंजूर होऊन महिनाभराचा कालावधी लोटत आला तरी अद्यापही सव्वालाखावर शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला असून, पीकविम्याची रक्कमही मिळत नसल्याने त्यांच्या समोरील अडचणींचा डोंगर वाढत आहे.
गतवर्षी पावसाच्या हलरीपणामुळे खरीप हंगाम शेतक-यांच्या हातून गेला होता. पावसाअभावी यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा अद्यापही पत्ता नसल्याने यंदाचाही खरीप हंगाम धोक्यात आला आहे. गतवर्षीच्या खरिप हंगामात पेरणीनंतर शेतक-यांनी सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी, तूर व कापूस या पिकांसाठी लाखो शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ दुष्काळी स्थितीमुळे महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील पिकांची आणेवारी जाहीर केली़ नजर आणेवारी आणि अंतीम आणेवारीमध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद झाली होती़ शासनाच्या निर्णयानुसार विमा काढलेल्या क्षेत्रामध्ये पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट असेल तर त्या भागातील शेतक-यांना विमा नुकसान भरपाई देण्यात येते़
दरम्यान, राज्य शासनाने जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याने शेतक-यांना पीक विमा मिळण्याच्या हालचालींना वेग आला होता़ गतवर्षीच्या खरिप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीकडून जिल्ह्यातील २ लाख ६४ हजार ५०१ शेतक-यांना ६५ कोटी ७९ लाख रूपयांचा पीकविमा मंजूर झाला होता. आजवर विमा कंपनीने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी व ज्वारी या पिकांचा विमा काढलेल्या जिल्ह्यातील १ लाख २३ शेतक-यांच्या खात्यावर ४५ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे़ मात्र, अद्यापही जिल्हाभरातील सव्वा लाखावर शेतक-यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. पीकविम्यासाठी शेतक-यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
निवेदन : विम्यापासून वंचित राहण्याची भीती
जालना : जालना तालुक्यातील गोलापांगरीअंतर्गत गोलापांगरी आणि गोलावाडी (गणेशनगर) अशी दोन स्वतंत्र महसुली गावे आहेत. परंतु पीकविमा भरताना गणेशनगर गावाचा समावेश नाही. त्यामुळे गणेशनगर या गावातील शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे.
त्यामुळे गोलावाडी या गावाच्या नावात बदल करून शेतक-यांना पीकविमा भरण्यासाठी गणेशनगर या गावाचा समावेश करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर नरेश अवघड, अक्षय गायकवाड, सचिन अवघड, एकनाथ जिगे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षºया आहेत.