बोले..सोनिहालचा जालन्यात जयघोष..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:08 AM2019-11-13T00:08:42+5:302019-11-13T00:09:49+5:30
जालना : गुरूनानक देव यांच्या ५५० व्या जयंती निमित्त जालना शहरात गेल्या आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ...
जालना : गुरूनानक देव यांच्या ५५० व्या जयंती निमित्त जालना शहरात गेल्या आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधी पंचायत भवन आणि जुना जालन्यातील गणपती गल्लीस्थित गुरूव्दारामध्ये गुरूग्रंथ साहेब या ग्रंथाचे सामूहिक पठण करण्यात आले.
मंगळवारी सकाळी सिंधी पंचायत भवन जवळून गुरूग्रंथ साहेब ग्रंथाची सजविलेल्या रथातून मिरणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शीख, सिंधी तसेच पंजाबी खत्री बांधवांची उपस्थिती होती.
सकाळी नऊ वाजता निघालेल्या या मिरणूकीच्या स्वागतासाठी जालना शहर सजले होते. मिरणूक ज्या भागातून जाणार होती, तेथे सडा-रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात येत होते. यावेळी पंचप्यारे या धर्मगुरूंचेही अनेक भाविक मनोभावे दर्शन घेतांना दिसून आले. मिरणूक शहराच्या विविध प्रमुख भागातून काढण्यात आली. बोले सोनिहाल..., संत श्रीयाकाल..., गुरूनानक देव की, जय. या घोषणांनी शहरात भक्तीमय वातावरण झाले होते. मिरणूकीनंतर महाप्रसाद-लंगरचे आयोजन करण्यात आले होते.
जुना जालना भागातील गुरूव्दारामध्येही सकाळपासून पंजाबी खत्री बांधवानी दर्शनासाठी गर्दी केली होती. या निमित्त विशेष पूजेचे आयोजन करून नंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूनानक जयंती निमित्त गुरूव्दारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरूनानक जयंतीनिमित्त अन्नदानही करण्यात आले.