जालना नगरपरिषदेत कोरोना काळात घोटाळा; लिपिकाने वसूल केलेला १८ लाखांचा दंड हडपला
By दिपक ढोले | Published: March 4, 2023 05:14 PM2023-03-04T17:14:39+5:302023-03-04T17:15:42+5:30
कोरोना काळात लावण्यात आलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने पथके तैनात करण्यात आली होती.
जालना : कोरोना काळात दंडापोटी जमा झालेली १८ लाख ३२ हजार ४४० रुपयांची रक्कम जमा न करताच, परस्पर हडपल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या लिपिकाविरुद्ध शनिवारी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दिनकरराव अग्निहोत्री (रा. नगरपरिषद कार्यालय) असे संशयिताचे नाव आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने पथके तैनात करण्यात आली होती. या पथकात नगरपालिका कर्मचारी, पोलिस, शिक्षक आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. विनामास्क फिरणे, सुरक्षित अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंड करण्यासाठी पालिकेने या पथकातील कर्मचाऱ्यांना पावती पुस्तके दिली होती. पालिकेतील लिपिक संशयित संतोष अग्निहोत्री याच्यामार्फत ३९५ पावती पुस्तके पथकाला देण्यात आली होती. १५ जुलै २०२० ते ३० एप्रिल २०२२ या काळात ३९५ पावती पुस्तकांपैकी ३४७ पावती पुस्तके नगरपालिकेकडे जमा झाली होती. परंतु, दंड वसुली रक्कमेत भ्रष्टाचार झाल्याबाबत नगरपरिषदेकडे तक्रार दाखल झाली होती. नंतर मुख्याधिकाऱ्यांनी सदरील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लेखा परीक्षक श्रीरंग भुतडा यांना नेमले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, सदर चौकशीमध्ये संतोष अग्निहोत्री यांनी ३९५ पावती पुस्तकांपैकी ३४७ पावती पुस्तके चौकशी अधिकाऱ्याकडे उपलब्ध करून दिली. उर्वरित ४८ पावती पुस्तके उपलब्ध करून दिली नाहीत. शिवाय, तीन बनावट पावती पुस्तके तयार करून ती नगरपरिषदेत जमा केल्याचे उघडकीस आले.
पालिकेत जमा झालेल्या ३४७ पावती पुस्तकानुसार ४२ लाख ७२ हजार ४४० रुपये दंड वसूल झाला आहे. मात्र, त्यापैकी संतोष अग्निहोत्री याने केवळ २२ लाख ४० हजार रुपयेच जालना पालिकेच्या रोखपालाकडे जमा केले आहे. उर्वरित १८ लाख ३२ हजार ४४० रुपये परस्पर हडपून अपहार केल्याचे स्पष्ट झाले. तसेच चौकशीमध्ये ४८ पुस्तके गायब केल्याचे आणि ३ पावती पुस्तके बनावट छापल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पालिकेचे उपमुख्याधिकारी महेश शिंदे यांच्या तक्रारीवरून शनिवारी संशयित लिपिक संतोष अग्निहोत्री याच्याविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.