तहसीलमध्ये चार लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:59 AM2019-07-11T00:59:29+5:302019-07-11T01:00:12+5:30
जुन्या दस्तऐवजांचे जतन व्हावे, यासाठी तहसील कार्यालयात दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. आतापर्यत ४ लाख विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुन्या दस्तऐवजांचे जतन व्हावे, यासाठी तहसील कार्यालयात दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. आतापर्यत ४ लाख विविध जुन्या कागदपत्राचे स्कॅनिग करण्यात आले आहे. यामुळे एका क्लिकवर अभिलेख दस्तऐवज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अनेक वर्षापासून शासकीय कार्यालयातील दस्तऐवजांचे व्यवस्थितपणे जतन होत नसल्याने विविध कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. परिणामी, एखाद्या जुन्या प्रकाणात संबंधित प्रकरणाची कागदपत्रे मिळण्यास अडचणी येतात. परिणामी त्यामुळे निकाल देण्यास अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. तसेच सर्वत्र डिजिटायझेशन होत असताना शासकीय दस्तऐवजाचे डिजिटायझेशन करण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. तहसीलने दीड वर्षात कार्यालयातील गावाचे नकाशे, महसूलचे दस्तऐवज, सातबारांचे उतारे, भूमी अभिलेख आदी महत्वाच्या चार लाख दस्तऐवजांचे स्कॅनिंग केले असून, उर्वरित दस्तऐवजांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरु आहे.
जालना तहसील कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील १५१ गावे येतात. या गावातील अनेक वर्षापासूनचे जुने दस्तऐवज तहसील कार्यालयात आहेत. यामध्ये जुने सातबारे, गावनकाशे आदी सात लाख दस्तऐवजांचा समावेश आहे. मात्र यातील अनेक कागदपत्रे जीर्ण झाल्याने त्यांचा सांभाळ करताना तहसीलच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दस्तऐवजाचे स्कॅनिंग करण्यात येत असल्याने कागदपत्रे सुरक्षित राहण्यास मदत होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार गणेश पोलास यांनी दिली.