परतूरचा १ कोटी १० लाखांचा टंचाई आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:39 AM2018-03-31T00:39:09+5:302018-03-31T13:04:15+5:30
तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.
शेषराव वायाळ/परतूर : तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते.
परतूर तालुक्यात यावर्षी झपाट्याने पाणी पातळी खालावत आहे. दररोज बोअर व विहरिंचे पाणी हाबकत आहे. मागील वर्षी केवळ पाच गावांतील विहिरींचे अधिग्रहण करणाऱ्या तालुक्याने यावर्षी १ कोटी ९ लाख ८० हजारांचा पाणी टंचाई कृती आराखडा सादर केला आहे. यामध्ये नवीन विहीर घेणे १४ लाख ४० हजार, विंधन विहीर विशेष दुरुस्ती २ लाख १० हजार, नळ योजना विशेष दुरूस्ती ६ लाख, खाजगी विहीर अधिग्रहण करणे ३० लाख ६० हजार रूपये टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे ५६ लाख ७० हजार रूपये असे एकूण १ कोटी ९ लाख ८० हजार रूपयांचा खर्च ग्रामीण भागातील टंचाई ग्रस्त गावात अपेक्षित आहे. मागील वर्षी पाणी टंचाईच्या झळांची तीव्रता एवढी नव्हती केवळ पाच गावात विहिरींचे अधिग्रहण करावे लागले होते. यासाठी ९० हजार रूपये खर्च झाला होता. तोच खर्च यावर्षी दहा पटीपेक्षाही अधिक होण्याची शक्यता आहे. पाणी पातळी लवकरच खालावल्याने काही गावात पाणी टंचाईची ओरड होऊ लागली आहे. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी साठा सद्या पन्नास टक्क्यांवर आला आहे. या धरणावर यावर्षी परतूर, सेलूसह नव्याने परभणी व पुर्णा शहराचीही तहान भागविण्याची जबाबदारी आहे. याच वर्षी परभणी व पुर्णेसाठी या धरणातून आतापर्यंत दोन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे निम्न दुधनाच्या बॅक वॉटर मध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे आता भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या धरणाच्या उपशावरही निर्बंध आणावे लागतील. एकूणच या वर्षी पंचायत समितीने सादर के लेल्या पाणी टंचाई कृती आराखडयावरून ग्रामिण भागात पाणी प्रश्न गंभिर होण्याची चिन्ह दिसत आहेत.