जालन्याच्या नवीन मोंढ्यातील दुकानातून साडेपाच लाखांची सुगंधित सुपारी, तंबाखू जप्त
By विजय मुंडे | Published: July 6, 2023 07:22 PM2023-07-06T19:22:28+5:302023-07-06T19:23:30+5:30
गुन्हे शाखेची कारवाई : दुकानमालकाविरुद्ध गुन्हा दाखल
जालना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत पाच लाख ४४ हजार ७६० रुपये किमतीची सुगंधित तंबाखू, सुपारीचा साठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सकाळी शहरातील नवीन मोंढा भागातील एका दुकानातील करण्यात आली असून, या प्रकरणात दुकानमालकाविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील नवीन मोंढा भागातील मोहन ट्रेडर्स या दुकानात सुगंधित तंबाखू, सुपारीचा साठा असल्याची माहिती स्थागुशाचे पोनि. रामेश्वर खनाळ यांना मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी नवीन मोंढा भागातील मोहन ट्रेडर्स दुकानावर धाड मारली. त्यावेळी प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू, सुपारी असा एकूण पाच लाख ४४ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अन्नसुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुकानमालक राजेंद्र मोहन अग्रवालविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चंदनझिरा पोलिस करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पाेलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पाेलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोहेकॉ. विनोद गडदे, गोकुळसिंग कायटे, गोपाळ गोशिक, संभाजी तनपुरे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, ईरशाद पटेल, धीरज भोसले, कैलास चेके, योगेश सहाने, रमेश पैठणे यांच्या पथकाने केली.