ही तर जणू बिरबलाची खिचडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:15 AM2017-12-27T00:15:44+5:302017-12-27T00:15:49+5:30
अंबड तालुक्यातील वडीगोद्री केंद्रामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेचा शालेय पोषण आहार हा तांदूळ व इतर साहित्य पुरवठा न झाल्याने बंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री केंद्रामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळेचा शालेय पोषण आहार हा तांदूळ व इतर साहित्य पुरवठा न झाल्याने बंद झाला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.
वडीगोद्री केंद्रामधील अनेक जि. प. शाळांना दीड ते दोन महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचे साहित्य मिळाले नाही. यामध्ये वडीगोद्रीमधील जायकवाडी वसाहत, पिठोरी सिरसगाव, धाकलगाव, भगवान नगर, शिवाजीनगर, गहिनीनाथनगर, राजेश नगर इ. जि. प. शाळांचा समावेश आहे. यापैकी काही शाळांमधील शालेय पोषण आहाराचे वाटप बंद असून उधारीवर कसेबसे हे काम सुरु आहे. तर काही शाळांमध्ये पूर्णत: शालेय पोषण आहाराचे वाटप बंद आहे.
शालेय पोषण आहाराचा तांदूळ व इतर साहित्य वाटप सुरू असून, ज्या जिल्हा परिषद शाळेला साहित्य मिळाले नाही, त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी बाजार किमतीप्रमाणे पोषण आहाराचे साहित्य खरेदी करून खिचडी शिजवावी. तसेच त्याचे स्वतंत्र बिल सादर करावे.
- पांडुरंग कवाणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, जालना)