शोधमोहिमेत आढळले १३१ कुष्ठरुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:36 AM2020-01-26T00:36:16+5:302020-01-26T00:36:53+5:30
आरोग्य विभागाच्या कुष्ठरोग शोधमोहिमेत जिल्ह्यात १३१ कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आरोग्य विभागाच्या कुष्ठरोग शोधमोहिमेत जिल्ह्यात १३१ कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने आता जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी कुष्ठरोग, क्षयरोग जागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाभरातील ७७९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले असून, २३७२ शाळा व १९७५ अंगणवाड्यांच्या माध्यमातून जागृती केली जाणार आहे.
केंद्र सरकारने २०२० पर्यंत देशातून कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार राज्य सरकारने कृती आराखडा तयार केला आहे. ही मोहीम राज्यात सर्वत्र राबविण्यात आली. या अभियानात कुष्ठरुग्णांसह क्षयरोगाचेही रुग्ण शोधण्यात आले. नव्याने शोधण्यात आलेल्या या रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने याआधीही कुष्ठरुग्ण शोधले होते. जिल्ह्यात सध्या १३१ कुष्ठरूग्ण असून, या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त आहे. रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर या आजारांचा असंसर्गजन्य रोगात समावेश आहे. आजच्या बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार देणे तसेच या आजारांबाबत जागृती करण्यावर भर देण्यात आला आहे. हे आजार कशाने होतात? आजार टाळण्यासाठी काय करावे? याबाबत नागरिकांना योग्य माहिती मिळाल्यास या आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून जागृती करण्यात येत असून, यासाठी ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान कृष्ठरोग व क्षयरोग जागृती अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २३७२ शाळा, १९७५ अंगणवाड्यांच्या माध्यमातून प्रभातफेरी, निबंध स्पर्धा घेऊन जागृती केली जाणार आहे. तसेच रविवारी प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन करून ग्रामसभेमध्ये कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जागृती केली जाईल. ग्रामसभेत घोषणापत्र, प्रतिज्ञापत्राचे वाचन होणार आहे.
कुष्ठरोग हा मायक्रो बॅक्टेरियम लेप्री या कुष्ठजंतूमुळे होतो. कुष्ठरोगाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी असेल तर मात्र तीन ते पाच वर्षांच्या काळानंतर शरीरावर कुठेही कुष्ठरोगाची लक्षणे दिसू शकतात. शंभर नवीन कुष्ठरुग्णांपैकी साधारण १० ते १५ रुग्णांपासून दुसऱ्यास कुष्ठरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कुष्ठरोगासाठी विशिष्ट वयोगट नाही, हा आजार कुणालाही होऊ शकतो. देशात कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त आहे. या आजारावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. उशिराने उपचार झाल्यास कायमस्वरूपी विकृती येण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले.