मृतदेहाचा चोवीस तासांपासून शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:27 PM2018-01-07T23:27:04+5:302018-01-07T23:27:23+5:30

मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

 Search for the dead body from 24 hours | मृतदेहाचा चोवीस तासांपासून शोध

मृतदेहाचा चोवीस तासांपासून शोध

googlenewsNext

जालना / मठपिंपळगाव: मठपिंपळगाव येथून आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु दशरथ रत्नपारखे (४०) यांचा खून करून मृतदेह पुरून टाकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा दोन दिवसांपासून मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खोदकाम करीत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील कचरु दशरथ रत्नपारखे यांचे अपहरण झाल्याची घटना आठ जून २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात सहा संशयितांवर गुन्हा दाखल आहे. सुरुवातीला अंबड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास फारसा गांभिर्याने घेतला नाही. दरम्यान, वार्षिक तपासणीदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे अंबडला आले असता, मृत रत्नपारखे यांच्या आईने थेट महानिरीक्षकांकडे तक्रार करून आपल्या मुलाचा शोध लावण्याची मागणी केली होती. भारंबे यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेने शुक्रवारी गजानन सुदाम खेकडे व गणेश कारभारी जिगे (रा. मठपिंपळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कचरु रत्नपारखे यांचा खून करून मृतदेह मठपिंपळगाव शिवारातील एका विहिरीजवळ पुरल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी शनिवारपासून संशयितांनी सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम सुरू केले होते. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे रविवारी सकाळपासून पुन्हा जेसीबीच्या मदतीने खोदकाम सुरू करण्यात आले. दुपारनंतर खोदकाम करताना एक हाड सापडले. मात्र, सापडलेले हाड जनावराचे असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. सायंकाळी अंधार झाल्यामुळे खोदकाम थांबविण्यात आले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या प्रकरणात आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी सांगितले.
-----------
त्या जागेची रचना बदलली.
मारेक-यांनी ज्या विहिरीशेजारी खड्डा खोदून कचरु रत्नपारखे यांचा मृतदेह पुरला, ती विहीर एका नाल्याला लागून आहे.
घटनेला तब्बल सात काही महिने उलटून गेले. मधल्या काळात झालेल्या पावसामुळे नाल्याला पूर आल्याने या ठिकाणी माती व वाळू साचल्याने पूर्ण जागेची रचनाच बदली. त्यामुळे मारेकºयांनी मृतदेह नेमका कुठे पुरला, हे शोधणे कठीण झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Search for the dead body from 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.