शोध, तपासणी, उपचार ही त्रिसूत्री महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:08 AM2020-03-29T00:08:35+5:302020-03-29T00:09:24+5:30
विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत नागरिकांनीही घराबाहेर न पडता घरात राहूनच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना विषाणूचा संपूर्ण जगात प्रादूर्भाव होत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही. हा आजार संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यामध्ये रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या तीन बाबींवर भर देण्याची गरज आहे. या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत नागरिकांनीही घराबाहेर न पडता घरात राहूनच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्याकडून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के.राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नसला तरी जे परदेशातून व अथवा परराज्यातून व परजिल्ह्यातून आलेले नागरिक आहेत या सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी व त्यानंतर उपचार करण्यात यावेत. आरोग्य यंत्रणेने गतीने व अचुकतेने काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आशा वर्कसना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये व शहरांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईड या द्रव्याची फवारणी करुन निजंर्तुकीकरण करुन घेण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात एच. २, ओ. २ या द्रव्याची फवारणी करण्यात यावी.
कोरोषा विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पैसा, मनुष्यबळ तसेच साहित्यसामुग्रीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून पाच टक्के निधी राखीव ठेवला असून, यातूनच १२ कोटी १० लक्ष रुपये तर आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून ६० लक्ष असे एकूण १२ कोटी ७० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून एन-९५ मास्क, पीपीटी किट, ट्रिपल लेअर मास्क, सॅनिटायझर तसेच व्हँटीलेटरर्सच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच या कामासाठी सीएसआर फंडातूनही निधी उपलब्ध करुन घेण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही. परंतु, पॉझिटीव्ह रुग्णांची येत्या काळात संख्या वाढल्यास अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी जालना जिल्ह्यात स्वतंत्र अशा १०० खाटांच्या कोरोना रुग्णालयाची उभारणी करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची दवाखाने बंद असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना साध्या आजारवर उपचार घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांची दवाखाने सुरु करुन नागरिकांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.
जे व्यावसायिक सेवा देण्यास असमर्थ ठरतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू मिळतील यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्वस्त धान्य दुकानदारांनी पुढील सहा महिन्यांचे एका महिन्यात दोन महिने याप्रमाणे पुढील तीन महिने अन्नधान्य उपलब्ध करुन द्यावे असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन
जालना जिल्ह्यामध्ये परदेश, परराज्य, परजिल्ह्यातून आलेल्या व सर्दी, खोकला व ताप आहे काय याबाबत आरोग्य यंत्रणेमार्फत दोन लाख ६२ हजार कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. गावनिहाय रॅपीड अॅक्शन टीमची स्थापनासुद्धा करण्यात आल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आवश्यक तज्ज्ञांची भरती करण्याचे निर्देश दिले. यासह नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये, असेही टोपे यांनी सांगितले.